तिलक वर्माने केला धक्कादायक खुलासा, एका प्रसंगात जीव गमावण्याची आली होती वेळ
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तिलक वर्माने अलीकडेच आपल्या जीवघेण्या आजाराबद्दल मोठा खुलासा केला आहे. साल 2022 मध्ये भारतीय संघाच्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान तिलक वर्मा एका गंभीर आजाराशी झुंज देत होता. या मालिकेतील एका सामन्यात खेळताना त्याचे शरीर पूर्णपणे आकडले होते आणि बोटंही काम करेनाशी झाली होती. त्यानंतर त्याचा हात ग्लोव्ह्ज कापून बाहेर काढावा लागला होता.
त्या वेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांच्या मदतीमुळे तिलक वर्माचा योग्य वेळी उपचार होऊ शकला.
‘ब्रेकफास्ट ऑफ चॅम्पियन्स’ या नव्या एपिसोडमध्ये बोलताना तिलक वर्मा म्हणाला, “जेव्हा मी माझा पहिला आयपीएल सीझन मुंबई इंडियन्ससाठी खेळलो, त्यानंतर मला एक गंभीर आजार झाला. आजपर्यंत मी याबद्दल कधीच बोललो नव्हतो. मला रॅबडोमायोलिसिस नावाचा जीवघेणा आजार झाला होता, ज्यामुळे शरीरातील स्नायू आणि हाडं तुटू लागतात.
त्या काळात मी घरगुती क्रिकेट आणि ए-सीरीज खेळत होतो आणि कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो. मी पूर्णपणे फिट राहू इच्छित होतो. विश्रांती घेण्याऐवजी मी सतत जिममध्ये राहायचो. मला सर्वात फिट आणि उत्तम फिल्डर व्हायचं होतं.” पुढे तिलक वर्मा म्हणाला,
“मी बर्फाने अंघोळ करून स्वतःला ठीक करण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यामुळे स्नायूंवर खूप ताण आला आणि शेवटी ते तुटू लागले. माझ्या नसाही पूर्णपणे आकडल्या होत्या. बांगलादेश दौऱ्यात त्या वेळी मी शतक झळकावण्याचा पूर्ण प्रयत्न करत होतो, पण अचानक माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले आणि माझ्या बोटांनी काम करणे थांबवले. मला सगळे शरीर दगडासारखे वाटत होते. त्यानंतर मला मैदान सोडावे लागले. माझी बोट हलत नव्हती, त्यामुळे ग्लोव्ह्ज कापून हात बाहेर काढावा लागला.”
Comments are closed.