तिरुपती मंदिरातील कर्मचारी हिंदू असणे आवश्यक आहे

आंध प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मागणी

वृत्तसंस्था / विजयवाडा

भारतासह जगभरातील हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानात किंवा तिरुपती मंदिरात केवळ हिंदू धर्माचेच कर्मचारी नियुक्त केले जावेत, अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री नायडू यांनी या मंदिरात पूजाआर्चा केल्यानंतर ही मागणी देवस्थानच्या प्रशासनाकडे केली. अन्य धर्मांचे जे कर्मचारी या मंदिरात आहेत, त्यांच्या भावनांचा अनादर न करता त्यांची बदली अन्यत्र केली जावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यांची सूचना हा आदेशच असल्याचे मानण्यात येत आहेत.

देशातील सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये तिरुपतीच्या भगवान व्यंकटेश्वराची मंदिरे स्थापन करण्याची आंध्र प्रदेश सरकाची भव्य योजना आहे. ही योजनही शुक्रवारी त्यांनी लोकांसमोर सादर केली. भगवान व्यंकटेश्वराच्या नावे भारतासह जगभरात असलेल्या संपत्तीच्या संरक्षणासाठी आम्ही पवित्र बंधन हाती बांधले आहे. विदेशांमधील अनेक भक्तही तिरुपती देवस्थानाची स्थापना त्यांच्या देशात करावी, अशी मागणी करीत आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्री नायडू यांनी दिली.

मुमताज हॉटेलला अनुमती नाही

तिरुपती मंदीर परिसराच्या पावित्र्याचे रक्षण केले जाईल. या मंदिराच्या परिसरात असणाऱ्या उंच पर्वतांवर कोणत्याही व्यापारी व्यवहारांना अनुमती दिली जाणार नाही. मंदिराच्या परिसरातील काही एकर भूमीवर मुमताज हॉटेल बांधण्यास मागच्या रे•ाr सरकारने अनुमती दिली होती. ती अनुमती आमच्या सरकारने रद्द केली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री नायडू यांनी केली. मंदीर परिसरात कोणत्याही खासगी व्यावसायिक आस्थापनाला अनुमती दिली जाणार नाही. तसेच, ज्यांना भक्तांसाठी आहाराची व्यवस्था करण्याची कंत्राटे दिली गेली आहेत. त्यांनी आपल्या खाद्यपेय केंद्रांमधून केवळ शाकाहारी आहारच उपलब्ध करावा, अशाही सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी केली.

सहपरिवार दर्शन

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी सहपरिवार भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. त्यांच्यासह त्यांचे पुत्र आणि केंद्रीय मंत्री नरा लोकेश हेही होते. मुख्यमंत्री नायडू यांनी मंदिरात पांरपरिक वेषभूषेत पूजाआर्चा केली. त्यांनी दर्शनासाठी वैकुंठ रांग परिसरातून मंदिरात प्रवेश केला. देवस्थान समितीचे अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी देवस्थानाच्या प्रवेशद्वारात त्यांचे स्वागत केले. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. तेलगु देशमचे अनेक कार्यकर्तेही परिसरात आले होते.

मुख्यमंत्री नायडूंना नातवाची प्राप्ती

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या घरी नातवाचा जन्म नुकताच झाला आहे. त्याचे नामकरण देवांश असे करण्यात आले आहे. आपल्या नातवाच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी भगवान व्यंकटेश्वराच्या एका दिवसाच्या प्रसादाचा खर्च उचलला आहे. त्यांनी शुक्रवारी वेंगमम्बा अन्नदान वितरण केंद्राला भेट देऊन तेथे भाविकांना अन्नदान करण्याचे पवित्र कृत्यही केले. भगवान व्यंकटेश्वरावर आपली नितांत श्रद्धा आहे, असे त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर आवर्जून प्रतिपादन केले.

Comments are closed.