बंगाल निवडणुकीपूर्वी TMC नेत्याची हत्या
रस्त्यालगत आढळला मृतदेह : परिसरात तणाव
वृत्तसंस्था/कोलकाता
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेत्याच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. उत्तर 24 परगणा जिह्यात टीएमसी नेते मसिउर गाझी (41) यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह गुरुवारी हाडोआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नब्बाई पट घेरी परिसरात रस्त्याच्या कडेला आढळला. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही हत्या दुसरीकडे झाली असून मृतदेह येथे आणून टाकण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. अंतर्गत वैर, राजकीय कारणे आणि व्यावसायिक वाद यासह सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत मसिउर गाझी हे देगंगा भागातील चंपातळा परिसरातील प्रभावी नेते होते. ते व्यवसायाने कपड्यांचे व्यापारी असून पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते मानले जात होते. या घटनेमुळे परिसरातील राजकीय तणाव वाढला आहे. या भागात 29 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
Comments are closed.