दिवा, मुंब्र्यातील बेकायदा बांधकामांवर टास्क फोर्सचा वॉच; ठाणे पालिकेचे विशेष पथक

माहेरघर असलेल्या ठाण्याच्या दिवा आणि मुंब्यातील बेकायदा बांधकामांवर आता टास्क फोर्सचा वॉच असणार आहे. या बेकायदा बांधकामांना चाप लावण्यासाठी तसेच या भागातील बांधकामांवर देखरेख करण्यासाठी पालिका आयुक्तांनी विशेष पथके तयार केली आहेत. दिवा आणि मुंब्रा भागातून बेकायदा बांधकामांच्या तक्रारींचा पाऊस पडत असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला असून टास्क फोर्समध्ये अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
गेल्या तीन वर्षांत बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर ठाण्यात बेकायदा बांधकामे प्रचंड वेगाने वाढली आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या दोन वर्षांत तब्बल 358 बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 223 बेकायदा इमारती या एकट्या मुंब्रा आणि दिव्यात उभ्या राहिल्या आहेत. या बेकायदा बांधकामांना चाप लावण्यासाठी, दिवा आणि मुंब्रा या भागावर देखरेख करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष पथक निर्माण करण्याचे आदेश ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. पालिका क्षेत्रातील बांधकामांवरील कारवाईचा आढावा महापालिका आयुक्त राव यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला.
न्यायालयाने बेकायदा बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व प्रभाग समिती क्षेत्रात कारवाई पालिकेच्या अतिक्रमण पथकाने सुरू केली आहे. आतापर्यंत 227 बांधकामांवर कारवाई झाली असून 24 गुन्हे दाखल झाले आहेत. कारवाईदरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, असे आदेशही आयुक्त राव यांनी दिले.
गणेशोत्सव काळात कारवाई नाही
बेकायदा परंतु राहत्या घरांवर गणेशोत्सव काळात कारवाई केली जाणार नाही. मात्र अधिकृतपणे बांधकाम सुरू असलेली, कुणीही राहत नसलेली, त्याचबरोबर व्यावसायिक स्वरूपाची या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा राव यांनी बैठकीत दिला आहे.
धोकादायक इमारती सील करा
पावसाळ्यातील आताचा काळ धोकादायक इमारतींसाठी कसोटीचा आहे. त्यामुळे अजूनही ज्या अतिधोकादायक इमारतींमध्ये नागरिक राहत आहेत त्या इमारती तातडीने रिक्त करून त्या सील कराव्यात. त्याचा ताबा पुन्हा रहिवाशांनाच दिला जाईल, असा विश्वास त्या नागरिकांना द्यावा, असे आयुक्त राव यांनी पुन्हा स्पष्ट केले.
Comments are closed.