'आत्मा' घेण्यासाठी रुग्णालयात
मध्यप्रदेश राज्यातील रतलाम येथील रतलाम वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक अद्भूत घटना घडली आहे. त्या दिवशी रुग्णालयात अचानक काही लोक घुसले. त्यांच्या हातात ढोल-ताशे आणि तलवारीही होत्या. त्यामुळे रुग्णालयात एकच घबराट उडाली. तेथील इतर रुग्ण, डॉक्टर्स आणि कर्मचारीवर्ग यांची पाचावर धारण बसली. अखेरीस, रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने या जमावातील एकाला रुग्णालयात येण्याचे कारण विचारले.
त्याने जे उत्तर दिले, ते ऐकून रुग्णालयातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. या रुग्णालयात तीन महिन्यांपूर्वी शांतिलाल नामक एका रुग्णाला आणण्यात आले होते. त्याने वीष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तो वीषप्राशनामुळे गंभीर अवस्थेत होता. त्याच्यावर उपचार होत असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शांतिलाल यांच्या परिवारातील एका मुलीला काही विचित्र अनुभव येऊ लागले. तिच्या म्हणण्यानुसार शांतिलाल यांचा आत्मा तिच्या शरीरात आला होता आणि मी रुग्णालयात अडकलो आहे. मला घरी घेऊन या, असे म्हणू लागला होता. त्यामुळे शांतिलाल यांच्या गावातील लोक त्यांचा आत्मा घेऊन जाण्यासाठी रुग्णालयात आले होते. हे कारण समजताच रुग्णालयातील लोकांना हायसे वाटले. नंतर गावकऱ्यांनी शांतिलाल यांच्या ‘आत्म्या’ला एका दगडात घातले आणि ते हा दगड वाजत गाजत घेऊन गावात आले. शांतिलाल यांच्या आत्म्याची इच्छा त्यांनी आता पूर्ण केली होती. त्यामुळे गावकरीही समाधानी होते. नंतर गावात शांतिलाल यांच्या घराच्या जवळ एक चबुतरा बांधण्यात आला. या चबुतऱ्यात तो आत्मा असलेला दगड स्थानापन्न करण्यात आला. गावकऱ्यांकडून त्याची पूजा करण्यात आली. हे सर्व झाल्यानंतर शांतिलाल यांच्या घरातील त्या युवतीला तसे अनुभव येईनासे झाले आहेत, असे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. आता या चबुतऱ्यात स्थापन केलेल्या दगडाची नियमित पूजा केली जाते. अनेक लोक त्याच्या दर्शनालाही येतात. या घटनेची चर्चा सध्या या गावाच्या पंचक्रोशीत होत आहे. अनेकांचा ‘आत्मा’ आदी बाबींवर विश्वास असत नाही. तथापि, अनेकांचा विश्वास असतोही. एकंदरीत, ही घटना एक अद्भूत घटना मानली जात आहे.
Comments are closed.