टॉय ट्रेनमध्ये हरवलेला चिमुकला आईच्या कुशीत; माथेरान स्थानकातील रेल्वे कर्मचारी मदतीला धावले

माथेरानला टॉय ट्रेनने जाणारे शेख कुटुंब स्टेशनवर उतरले खरे, पण सोबत आपल्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्या फुरकानला सोबत घेण्यास विसरले. त्यामुळे आई आणि लेकराची ताटातूट झाली. मात्र रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे आईपासून वेगळे झालेले लेकरू अर्ध्या तासानंतर पुन्हा आईच्या कुशीत विसावले. फुरकान शेख या चिमुकल्याच्या मदतीला आरपीएफचे जवान भगिनाथ खेडेकर आणि डेप्युटी स्टेशन सुपरवायझर मोहित तांडेल देवदूत बनून धावून आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

शेख कुटुंबीय टॉय ट्रेनने माथेरानला फिरण्यासाठी जात होते. मात्र ट्रेनमधून खाली उतरण्याच्या गडबडीत झोपलेल्या फुरकानला घेऊन जाण्यास विसरले. संपूर्ण कुटुंब माथेरानमधील हॉटेलमध्ये पोहोचले. काही वेळाने चिमुकला दिसत नसल्याचे लक्षात येताच त्याच्या कुटुंबाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. तरीदेखील त्याचा थांगपत्ता न लागल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. माथेरान स्थानकावर ड्युटीवर असताना आरपीएफ जवान भगिनाथ खेडेकर यांना लहान मुलगा रडताना दिसला. त्यांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण आईच्या आठवणीने तो व्याकुळ झाला होता. त्यामुळे खेडेकर यांनी चिमुकल्याला स्टेशन मास्तरच्या कार्यालयात नेले.

जीव भांड्यात पडला
डेप्युटी स्टेशन सुपरवायझर मोहित तांडेल यांनी स्टेशनवर घोषणा करून आईचा शोध सुरू केला. अर्ध्या तासानंतर चिमुकल्याचे आजोबा इसहाक शेख हे माथेरान स्थानकावर नातवाला शोधण्यासाठी आले. अनाऊन्समेंट ऐकताच त्यांचा जीव भांड्यात पडला. तसेच त्यांनी लगेच स्टेशन मास्टरचे ऑफिस गाठले. तेथे आपल्या लाडक्या फुरकानला पाहताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पोलीस व स्टेशन मास्टरांनी ओळख आणि कागदपत्रांची पडताळणी करून चिमुकल्याला आजोबांच्या ताब्यात दिले.

Comments are closed.