गणेशोत्सवात कोकणसाठी टोलमाफी, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना आज बाप्पा पावला. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य शासनाने टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या टोलमाफीसाठी शिवसेनेने सातत्याने पाठपुरावा केला होता.

गणेशोत्सवासाठी मुंबई व अन्य भागांतून लाखो चाकरमानी आवर्जून कोकणात जातात. कोकणातील गणेशोत्सवाची शानच काही और असते. रेल्वे, एसटीची रिझर्व्हेशन्स फुल्ल झाल्याने अनेक चाकरमानी खासगी वाहनांचा पर्याय अवलंबतात. मात्र टोलसाठी त्यांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. पण सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

11 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत ही टोलमाफी लागू राहील. अटल सेतूसह कोकणात जाणाऱ्या प्रमुख महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारितील कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवर टोल भरावा लागणार नाही. खासगी वाहनांप्रमाणेच राज्याच्या विविध भागांतून कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसनाही या टोलमाफीचा लाभ मिळणार आहे. या टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी चाकरमान्यांना ‘गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन’ पास मात्र अनिवार्य असणार आहे.

हा मार्ग टोल फ्री आहे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना टोलमाफी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागील महिन्यात निवेदन दिले होते. मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्यामुळे चाकरमानी पुणे, कोल्हापूरमार्गे कोकणात जात असतात. त्या मार्गांवर अनेक टोलनाके आहेत. या सर्व महामार्गांवरील टोलनाक्यांवर 11 सप्टेंबरपासून टोलमाफी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी त्यात केली होती.

Comments are closed.