जवान तोमनने पाय गमावूनही जागतिक पॅरा तिरंदाजीत जिंकले सुवर्ण

दक्षिण कोरियात झालेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा तोमन कुमार हा केवळ विजेताच नव्हे तर अपार धैर्याचे उदाहरण ठरला आहे. छत्तीसगडमधील नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान आयईडी स्फोटात पाय गमावलेल्या या सीआरपीएफ जवानाने कठीण प्रसंगांवर मात करून जागतिक स्तरावर हिंदुस्थानचे नाव उज्ज्वल केले आहे.

30 वर्षीय तोमन हा सीआरपीएफचा कॉन्स्टेबल असून आतापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पॅरा तिरंदाजी स्पर्धांत सात पदके जिंकली आहेत. दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू येथे झालेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत त्यांनी नवा इतिहास रचला.

तोमनच्या शौर्याची कहाणी

तोमन 2022 मध्ये सीआरपीएफच्या त्या तुकडीचा भाग होता जी देशातील सर्वाधिक नक्षल हिंसाग्रस्त भागांपैकी एक असलेल्या दक्षिण बस्तरमध्ये तैनात होती.

फेब्रुवारी 2022 मध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या तीव्र चकमकीदरम्यान झालेल्या स्फोटात तोमन गंभीर जखमी झाला आणि 12 फेब्रुवारीला त्याचा डावा पाय कापावा लागला. तोमन कुमार 2017 मध्ये केवळ 26 वर्षांचा असताना सीआरपीएफमध्ये दाखल झाला, पण बस्तरमधील त्या चकमकीत त्याला आपला पाय गमवावा लागला. तरीही त्याने कधी हार मानली नाही.

Comments are closed.