MPL 2025: एमपीएलचा पहिला सीझन गाजवणारे 5 फलंदाज

महाराष्ट्र प्रीमियर लीग अर्थात एमपीएल 2025चा 4 जुनपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा 22 जून रोजी संपणार आहे. स्पर्धेत 34 सामने खेळवले जाणार असून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज क्रिकेटपटू यात खेळताना दिसतील. या लीगचा हा तिसरा हंगाम असून रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, पुणेरी बाप्पा, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स आणि कोल्हापूर टस्कर्स हे 6 संघ खेळताना दिसतील. या स्पर्धेत आजपर्यंत अनेक फलंदाजांनी चौकार षटकारांची बरसात केली आहे. त्यामुळे यावेळीही ऑरेंज कॅपसाठी तगडी स्पर्धा आपल्याला दिसू शकते.

एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून 2023 साली सुरु झालेल्या या लीगमध्ये पहिल्या हंगामात दिग्गज फलंदाजांनी मोठी कामगिरी केली. त्यात पीबीजी कोल्हापूर टस्कर्सचे खेळाडू आघाडीवर होते.

पहिल्या हंगामात पीबीजी कोल्हापूर टस्कर्सच्या अंकित बावणेने 8 सामन्यात 60.50च्या सरासरीने 363 धावा केल्या होत्या. यामध्ये अंकितचे 1 शतक व 3 अर्धशतकांचा समावेश होता. त्यानंतर भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू व पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा कर्णधार केदार जाधवने धुव्वांदार फलंदाजी केली होती. 8 सामन्यात त्याने 230 धावा केल्या होत्या. त्याने दोन खणखणीत अर्धशतकी खेळी केल्या होत्या.

त्यानंतर तिसऱ्या स्थानावर युवा क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णीचे नाव येते. त्याने 3 सामन्यात 195 धावा केल्या होत्या. त्याने ईगल नाशिक टायटन्सकड़ून खेळताना ही कामगिरी केली होती. पुणेरी बाप्पाच्या पवन शहाने 7 सामन्यात 185 आणि रुतुराज गायकवाडने 4 सामन्यात 168 धावा केल्या होत्या.

यावेळीही दिग्गज खेळाडूंचा खेळ पहाण्याची संधी
एमपीएलचा हा तिसरा हंगाम असून यावेळी सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. 4 जून ते 22 जून दरम्यान प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन हे सामने मोफत पहाण्याची संधी फॅन्सला मिळणार आहे. याशिवाय सर्व सामने जिओहॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर स्टार स्पोर्ट्स 2 या टीव्ही चॅनेलवरही पहाण्याची संधी मिळणार आहे.

Comments are closed.