आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 विदेशी गोलंदाज; पहा संपूर्ण यादी

आयपीएल २०२६ चा थरार २८ मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक सरस विदेशी गोलंदाज आहेत, जे हरलेली बाजी पलटवण्याची ताकद ठेवतात. स्पर्धेच्या १९ व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी, या लीगमधील अशा पाच विदेशी गोलंदाजांबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
पहिल्या क्रमांकावर वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा मिस्ट्री स्पिनर सुनील नरेन याचे नाव येते. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा नरेन हा पहिला विदेशी गोलंदाज आहे. ही बातमी लिहेपर्यंत नरेनने आयपीएलमध्ये एकूण १८८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १८७ डावांत २५.६४ च्या सरासरीने १९२ विकेट्स मिळवल्या आहेत. नरेनच्या नावावर आयपीएलमध्ये एकदा पाच आणि सात वेळा चार विकेट्स घेण्याचा पराक्रम आहे. केकेआर संघाने आतापर्यंत आयपीएलची एकूण तीन जेतेपदे जिंकली आहेत आणि नरेन या तिन्ही संघांचा भाग होता.
दुसऱ्या क्रमांकावर त्याचाच देशबांधव आणि माजी क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याचे नाव येते. ब्राव्होने २००८ ते २०२२ दरम्यान आयपीएलमध्ये एकूण १६१ सामने खेळले. या काळात तो १५८ डावांत २३.८२ च्या सरासरीने १८३ विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला. आयपीएलमध्ये ब्राव्होच्या नावावर दोनदा चार विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.
तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी स्टार गोलंदाज लसिथ मलिंगा विराजमान आहे. मलिंगाने २००९ ते २०१९ दरम्यान आयपीएलमध्ये एकूण १२२ सामने खेळले. या दरम्यान त्याने १२२ डावांत १९.७९ च्या सरासरीने १७० विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये मलिंगाच्या नावावर एकदा पाच आणि सहा वेळा चार विकेट्स घेण्याची नोंद आहे.
चौथ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान याचे नाव येते. २७ वर्षीय खानने आयपीएलमध्ये १३६ सामने खेळताना १३६ डावांत २३.८३ च्या सरासरीने १५८ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये राशिद खानच्या नावावर दोनदा चार विकेट्स घेण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे.
पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आहे. ज्याने आयपीएलमध्ये १२० सामने खेळताना २६.२० च्या सरासरीने १४३ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये दोनदा चार विकेट्स घेण्याच्या विक्रमाचाही समावेश आहे.
Comments are closed.