MPL 2025 मध्ये धावांची लयलूट करणारे टॉप 5 बॅटर्स, विजेत्या नाशिकचे दोन स्तंभ यादीत
एमपीएल 2025 चा अंतिम सामना रविवारी (22 जून) पार पडला. गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स व रायगड रॉयल्स समोरासमोर आलेले. ईगल नाशिक टायटन्सने उत्कृष्ट सांघिक खेळ करत, विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत सर्व संघांनी मोठ्या धावा उभारल्या. धावांची लयलूट झालेल्या या स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणाऱ्या पाच फलंदाजांबद्दल आपण जाणून घेऊया.
सिद्धेश वीर- रायगड रॉयल्स संघाला विजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, अखेरच्या क्षणी गचाळ क्षेत्ररक्षणामूळे त्यांना विजेतेपदावर पाणी सोडावे लागले. असे असले तरी, संघाचा सलामीवीर सिद्धेश वीर याने संपूर्ण हंगामात आपल्या बॅटने धावांचा रतीब घातला. सिद्धेश याने ऑरेंज कॅप जिंकताना 11 सामन्यांमध्ये 450 धावांचा टप्पा गाठला. त्याने यादरम्यान 56.25 अशी शानदार सरासरी राखली. यामध्ये एक शतक व तीन अर्धशतके सामील होती. अंतिम सामन्यात देखील त्याने 99 धावांची नाबाद खेळी केली.
अर्शिन कुलकर्णी- सलग तिसऱ्या हंगामात ईगल नाशिक टायटन्स संघासाठी खेळणारा अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी एमपीएल 2025 मध्ये धावा काढण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने अंतिम सामन्यात 77 धावांची खेळी करत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे त्याने संपूर्ण हंगामात एकच अर्धशतक ठोकले. परंतु दहा सामन्यात 34.88 च्या सरासरीने त्याने 279 धावा काढल्या. त्याच्या बॅटमधून स्पर्धेत सर्वाधिक 18 षटकार आले.
मंदार भंडारी- अर्शिन कुलकर्णी प्रमाणेच मंदार भंडारी हा देखील ईगल नाशिक टायटन्स संघासाठी सलग तिसऱ्या वर्षी खेळत होता. हंगामातील पहिल्याच सामन्यात त्याने तुफानी शतक झळकावले होते. त्यानंतर त्याची बॅट काहीशी संथ झाली. मात्र, क्वालिफायरमध्ये पुन्हा एकदा अर्धशतक करून त्याने आपल्या संघाला अंतिम सामन्यात पोहोचवले होते. अंतिम सामन्यात तो आपल्या संघाला वेगवान सुरुवात देण्यात यशस्वी ठरला. त्याने या हंगामात 10 सामने खेळताना 152 च्या स्ट्राईक रेटने 270 धावा केल्या.
ऋषिकेश सोनवणे- ऋतुराज गायकवाड याच्या अनुपस्थितीत पुणेरी बाप्पा संघाच्या फलंदाजीची धुरा ऋषिकेश सोनवणे याने वाहिली. इतर फलंदाज सातत्य दाखवण्यात अपयशी ठरल्यानंतर, ऋषिकेश याने संघासाठी सर्वाधिक धावा बनवल्या. ऋषिकेश याने 10 सामन्यांमध्ये 242 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याची सरासरी 34.87 अशी राहिली. क्वालिफायर 2 मध्ये तो धावबाद झाल्याने पुणे संघाला पराभवाचे सामना करावा लागला होता.
अझीम काझी- सलग दोन वर्ष एमपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या रत्नागिरी जेट्स संघाचे आव्हान यावर्षी साखळी फेरीतच समाप्त झाले. मात्र, संघाचा कर्णधार अझीम काझी हा उत्कृष्ट फार्ममध्ये दिसून आला होता. त्याने हंगामात 7 सामने खेळताना 38.83 च्या सरासरीने 242 धावा उभ्या केलेल्या. यामध्ये दोन अर्धशतके सामील होती.
Comments are closed.