MPL 2025 मध्ये या टॉप 5 गोलंदाजांनी लावली विकेट्सची रास, पर्पल कॅपसाठी झाली झुंज
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये रविवारी (22 जून) अंतिम सामना खेळला गेला. ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रायगड रॉयल्स अशा झालेल्या या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने 191 धावांचा पाठलाग करत विजेतेपद पटकावले. मागील वर्षीच्या अंतिम सामन्यात आलेले अपयश भरून काढत त्यांनी ट्रॉफी उंचावली. त्याचवेळी या हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या पाच गोलंदाजांविषयी आपण जाणून घेऊया.
तनय संघवी- रायगड रॉयल्स संघाला एमपीएल 2025 जिंकण्यात थोडक्यात अपयश आले. अंतिम सामन्यात त्यांचा पराभव झाला असला तरी, संघाचा वेगवान गोलंदाज तनय संघवी हा पर्पल कॅप जिंकण्यात यशस्वी ठरला. त्याने स्पर्धेत सर्वाधिक 20 बळी मिळवले. विशेष म्हणजे त्याने मागील वर्षी देखील केवळ आठ सामन्यांमध्ये 20 बळींचा टप्पा पूर्ण केला होता. तनय याने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत प्रत्येक सामन्यात बळी मिळवण्याची किमया केली. अंतिम सामन्यात देखील त्याने आपल्या संघासाठी दोन बळी टिपले होते.
प्रशांत सोलंकी- ईगल नाशिक टायटन्स संघाने आपले पहिले विजेतेपद या हंगामात मिळवले. त्यांच्या या यशात कर्णधार प्रशांत सोलंकी याचा सिंहाच्या वाटा होता. प्रशांत याने स्पर्धेत 11 सामने खेळत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक 17 बळी टिपले. विशेष म्हणजे स्पर्धेत बळी घेण्याच्या बाबतीत त्याची सरासरी सर्वोत्तम 14.06 अशी राहिली. प्रशांत याने हंगामात दोन वेळा चार बळी टिपले.
निकित धुमाळ- पुणेरी बाप्पा संघाने स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली. त्यांच्या या यशात वेगवान गोलंदाज निकित धुमाळ याने महत्त्वाचे योगदान दिले. सुरुवातीच्या दोन सामन्यात तुफान गोलंदाजी करणाऱ्या निकितने त्यानंतरही आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले होते. हंगामातील तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून त्याने 10 सामन्यात 14 बळी आपल्या नावावर केले. यामध्ये एकदा तो चार बळी घेण्यात यशस्वी ठरला.
मुकेश चौधरी- आयपीएलचा अनुभव पाठीशी असलेल्या ईगल नाशिक टायटन्सच्या मुकेश चौधरी याने पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवला. नाशिक संघासाठी आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये तो बळी मिळवण्यात यशस्वी ठरत होता. नाशिक संघाला विजेता बनवताना त्याने 10 सामने खेळत 14 बळी टिपले. त्याने मनोज इंगळेसह नाशिकच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळली.
निखिल कदम- उपविजेत्या रायगड रॉयल्स संघासाठी तनय संघवी याच्या बरोबरीने युवा निखिल कदम याने वेगवान गोलंदाजीचा भार वाहिला. आपला पहिलाच हंगाम खेळत असलेल्या निखिलने डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करत अनेक फलंदाजांना चकवले. त्याच्या स्लोअर आणि कटर चेंडूचे उत्तर अनेक फलंदाजांकडे नव्हते. सुरुवातीला आणि डेथ ओव्हरमध्ये देखील गोलंदाजीचे कौशल्य असलेल्या निखिल याने 14 बळी टिपले.
Comments are closed.