MPL 2025: कोण होते एमपीएल 2023 मध्ये सर्वाधिक बळी घेणारे टॉप 5, एकाच संघाच्या तिघांत लागलेली रेस

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) ची सुरुवात 4 जून पासून होईल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा पुढील 20 दिवस चालेल. या यशस्वी स्पर्धेच्या पहिल्या हंगामात म्हणजेच एमपीएल 2023 मध्ये अनेक युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत ओळख बनवली होती. यामध्ये काही गोलंदाजांनी आपली दखल घ्यायला लावलेली. आज आपण एमपीएल 2023 मध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या पाच गोलंदाजांविषयी जाणून घेऊया.

एमपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात पुणेरी बाप्पा व कोल्हापूर टस्कर्स हे संघ समोरासमोर आले होते. या सामन्यातूनच पुणे संघाचा वेगवान गोलंदाज सचिन भोसले (Sachin Bhosale) प्रकाशझोतात आला. पहिल्या सामन्यातच त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाजी करणाऱ्या सचिनने आपल्या कामगिरीत सातत्य राखत स्पर्धेत सर्वाधिक 14 बळी मिळवले. या कामगिरीसाठी त्याला पर्पल कॅप देण्यात आली.

सचिन भोसले याचा दुसऱ्या बाजूने भागीदार असलेला वेगवान गोलंदाज पियुष साळवी (Piyush Salvi) आपल्या उसळी घेणाऱ्या चेंडूंनी ओळख बनवण्यात यशस्वी ठरलेला. एका जागी टिच्चून गोलंदाजी करण्याची त्याची योग्यता वाखाणण्याजोगी होती. त्याने स्पर्धेत सात सामने खेळताना सचिन पाठोपाठ 12 बळी टिपलेले.

एमपीएल 2023 मध्ये सर्वाधिक बळी मिळणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कोल्हापूर टस्कर्सचा मनोज यादव (Manoj Yadav) तिसऱ्या क्रमांकावर राहिला. स्पर्धेत बळींचे एकमेव पंचक मनोज यानेच मिळवले होते. तसेच स्पर्धेतील पहिली हॅट्रिक त्याच्याच नावे आहेत. त्याने एमपीएल 2023 मध्ये 7 सामने खेळताना अकरा बळी आपल्या नावे केले होते.

पुणेरी बाप्पाच्या सचिन भोसले व पियुष साळवी या वेगवान गोलंदाजी जोडी सोबतच फिरकीपटू रोहन दामले (Rohan Damle) हा देखील सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील होता. अखेरच्या काही सामन्यात नेतृत्व करणाऱ्या रोहनने 7 सामन्यात 9 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.

एमपीएल 2023 चे विजेतेपद रत्नागिरी जेट्स संघाने पटकावले होते. संघाच्या या यशात वेगवान गोलंदाज विजय पावले (Vijay Pawle) हा महत्त्वाचा खांब राहिला होता. टेनिस क्रिकेटमधून व्यावसायिक क्रिकेटकडे वळालेल्या विजयने आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने सर्वच फलंदाजांना जखडून ठेवले. त्याने स्पर्धेत केवळ पाच सामने खेळताना 9 गडी बाद केले.

आ. रोहित पवार (Rohit Pawar) अध्यक्ष असलेली महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही स्पर्धा आयोजित करत असते. या स्पर्धेतील सामने गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विना तिकीट पाहता येतात. यावर्षी एमसीएने प्रथमच महिलांसाठी WMPL सुरू केल्याने, क्रिकेटप्रेमींना क्रिकेटचा डबल डोस मिळेल. या दोन्ही स्पर्धांचे थेट प्रक्षेपण ओटीटी प्लॅटफॉर्मवर JioHotstar व टेलिव्हिजनवर Star Sports 2 चॅनेलवर होईल. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)

Comments are closed.