झारखंडमध्ये टॉप नक्षलायट मारले
10 लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिह्यातील सारंडा जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत सीपीआय गटाच्या एका बड्या नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. अमित हंसदा उर्फ आप्टन असे ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. अमितवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. अमित हंसदा याने अनेक घातपाती कारवाया घडवून आणत पोलिसांची झोप उडवली होती. जिह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध हिंसक घटना घडवून आणण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
गोईलकेरा पोलीस स्थानक परिसरातील रेलापाराल जंगल आणि डोंगराळ भागात रविवारी सकाळी सुरक्षा जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. चाईबासा विभागाचे पोलीस अधीक्षक राकेश रंजन यांना गुप्तचर विभागाकडून नक्षलवादी मोठा घातपात घडवण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान सुरक्षा दलाचे जवान रेलापाराल भागात पोहोचले असता नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीदरम्यान नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले. शोध मोहिमेत सुरक्षा दलांना एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख पटली असून अमित हंसदा असे त्याचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी 13 ऑगस्ट रोजीही चाईबासा जिह्यातील पोपी जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यादरम्यान, छत्तीसगडचा रहिवासी असलेला एरिया कमांडर अरुण मारला गेला. त्याच्याकडून एक एसएलआर, काडतुसे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.
Comments are closed.