अमित शहा स्वत:साठी 2029 ची तयारी करत आहेत; राज ठाकरे यांचा मोठा दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात आयोजित पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित केले. या मेळाव्यात त्यांनी एसआयआरविषयी माहिती दिली. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार, आमदार चोरण्याच्या घटनेवरही प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पक्षफुटीच्या राजकारणावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. खासदार, आमदार ५० ते १०० कोटींसाठी विकले जात आहेत. ज्यांना निवडून देण्यासाठी सामान्य जनता उन्हामध्ये तासनतास रांगेत उभी राहते, तेच लोकप्रतिनिधी अशा प्रकारे विकले जात असल्याने त्यांनी अशा नेत्यांना पुन्हा निवडून देणार का? अशा परिस्थितीत निवडणुकीला काय अर्थ राहतो? असा सवालही त्यांनी केला. जनतेने रांगेत उभे राहायचे, मतदान करायचे आणि मोकळे व्हायचे, जनतेच्या मताला काही किंमतच राहिलेली नाही, असे ते म्हणाले. राज्यात भीषण दुष्काळ, बेरोजगारी, पेपरफुटी आणि महिलांच्या सुरक्षेसारखे गंभीर प्रश्न असताना, राजकारणी मात्र केवळ सत्तेसाठी आमदार आणि खासदार फोडण्यात मग्न आहेत. याला आपण निवडणूक म्हणणार का, या पळवापळवीच्या राजकारणात महाराष्ट्राचा स्वाभिमान, पंरपरा विसरत चाललो आहे.

शिवसेनेचे खासदार भाजपऐवजी शिंदे गटाकडे का गेले? अमित शहा हे २०२९ ची स्वत:साठी तयारी करत असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. भाजपमधील सोबत असतील, इतर गट देखील सोबत हवेत. भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. नरेंद्र मोदी असल्याने सर्व शांत आहे. वर्षभरात गोंधळ निर्माण होतील. त्यासाठी तुम्ही तयारीत राहिलं पाहिजे. यासाठी एसआयरसाठी तयारी करा, असा आदेशही त्यांनी दिला.

मतदारयादीत मतदारांचे नाव नसतील तर, तुम्ही काही करू शकत नाही. ममता बॅनर्जी यांची २७ लाख मते काढली. ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यात आला. सत्तेवर कोण बसलं, यापेक्षा सत्तेवर बसून काय करताय, हे महत्त्वाचं आहे. राज्यात, देशात काय पायंडे पाडत आहोत, याचे भान राहिलेलं नाही. सत्तेचा मार्ग मतदारयादीतूनच जातो. खोट्या मतदारांवर आक्षेप घेतला पाहिजे. आता घरोघरी जाऊन जनगणना झाली. त्यांच्यासोबत भाजपचे लोक होते. हे तुम्हाला नको कळायला? त्यांच्याशी बोलताना त्यांना त्यांच्या मतदाराविषयी कळते. खरंतर डोळ्यात तेल लावून लक्ष द्या. तीन वर्षात काय गायब होईल, हे कळणार नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

Comments are closed.