गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? चंद्रकांत पाटील यांचा पोलीस उपायुक्तांना फोन, घायवळ प्रकरणात मौन

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. वडगाव बु. परिसरात गौतमी पाटील हिच्या नावावर असलेल्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. सामाजी विठ्ठल मरगळे असे रिक्षा चालकाचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता याच प्रकरणी आता कोथरूडचे भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांना फोन करत दोषींवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. मात्र हेच चंद्रकांत पाटील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात मौन असल्याने अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

गौतमी पाटील हिच्या गाडीचा पुणे-मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ भीषण अपघात झाला होता. गौतमीच्या गाडी एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती. यात रिक्षा चालकासह 3 जण जखमी झाले होते. हा अपघात झाला तेव्हा गौतमी गाडीमध्ये नव्हती. या प्रकरणाचा पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याचा आरोप जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केला असून त्यांनी चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली. या भेटीवेळी चंद्रकांत पाटील यांनी पोलीस उपायुक्तांना फोन केला.

गौतमी पाटील हिला उचलायचं की नाही? असा सवाल चंद्रकांत पाटील पोलीस उपायुक्तांना करतात. रिक्षावाला गंभीर जखमी झालेला आहे. गौतमी पाटील गाडीमध्ये नव्हती, पण कुणीतरी गाडी चालवत असेलच ना. ती गाडी जप्त करून गाडीची मालकीन गौतमी पाटील हिला नोटीस द्या, असे चंद्रकांत पाटील पोलीस उपायुक्तांशी बोलताना म्हणतात.

Comments are closed.