भविष्यात सायबर युद्ध वाढेल.
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भविष्यकाळातील युद्धांमध्ये सायबर युद्धांचे, तसेच ‘कॉग्नेटिव्ह’ (संपर्क) युद्धांचे प्रमाण वाढणार आहे. ही युद्धे ज्याप्रमाणे भूमीवर, सागरात, आकाशात आणि पारंपरिक पद्धतीने केली जातील, तशीच ती इंटरनेट, सायबर क्षेत्र आणि अन्य ऑन लाईन मार्गांनीही केली जातील. आम्ही कोणत्याही प्रकारच्या युद्धासाठी सज्ज आहोत. तंत्रज्ञानाच्या विकासासमवेत युद्धांच्या प्रकारांमध्ये आणि पद्धतींमध्येही मोठे परिवर्तन होत असून आम्ही भारतीय सेना दलांना त्यादृष्टीने सक्षम बनविण्यासाठी अनेक योजनांवर काम करीत आहोत, असे आश्वासक प्रतिपादन भारताचे संरक्षणदल प्रमुख अनिल चौहान यांनी केले आहे. महाराष्ट्रातील एका कार्यक्रमात ते भाषण करीत होते. भारताच्या संरक्षणासाठी जे करता येणे शक्य आहे, ते सर्व त्वरेने करण्यावर आमचा भर आहे, असे त्यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले आहे.
कृत्रिम बुद्धीमत्ता, यंत्रमानवी तंत्रज्ञान, सायबर सिस्टिम्स, ड्रोन्स, अॅटोनॉमस प्लॅटफॉर्म्स, अवकाश तंत्रज्ञान, अचूक लक्ष्यभेद करणारी शस्त्रास्त्रे, आणि माहिती वर्चस्व हे सर्व प्रकार भविष्यकालीन युद्धांसाठी निर्णायक ठरणार आहेत. प्रत्येक सैनिकाने आणि अधिकाऱ्याने या नव्या प्रकारांची माहिती करुन घेणे आणि त्यांचे ज्ञान संपादन करणे अत्यावश्यक ठरणार आहे. भारतीय सुरक्षा व्यवस्थेने कोणत्याही परिस्थितीला तोड देण्यासाठी या सर्व प्रकारांचा अभ्यास चालविला असून भविष्यात हे सर्व प्रकार आम्ही आत्मसात केलेले असतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
Comments are closed.