भाजप आमदार बंगल्यामध्ये असताना शेतकरी पेट्रोलसोबत घेऊन शिरला, अन्… मध्यरात्रीच्या सुमारास बुल
बुलधाना बातम्या: राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून वातावरण चांगलेच तापले असतानाच बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार संजय कुटे यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानावर एका शेतकऱ्याने पेट्रोल घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळेवर प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील विशाल मुरुड या शेतकऱ्याने हातात पेट्रोलचा कॅन घेऊन कुटे यांच्या घराच्या प्रवेशद्वाराकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो ओरडत होता की, “माझ्या शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून, अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे मी आमदारांचा बंगला पेटवतो.”
यावेळी आ. कुटे यांच्या स्वीय सहाय्यकाने तत्काळ हस्तक्षेप करून मुरुड याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी BNS 333 आणि 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहेत. राज्यात शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, खरीप हंगामाची तयारी करताना पुन्हा पावसामुळे अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातच सरकारकडून मदतीचा मोबदला वेळेत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे, आणि याचेच परिणाम आता थेट लोकप्रतिनिधींवर तुटून पडताना दिसत आहेत.
संजय कुटे हे 2004 पासून सलग विधानसभेवर निवडून येत असून, भाजपचे विश्वासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. या घटनेनंतर जिल्ह्यात आणि राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची पार्श्वभूमी अधिक गंभीर ठरते कारण एकीकडे अमरावतीमध्ये बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत, तर दुसरीकडे पुण्यात प्रहार कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. त्यामुळे सरकारसमोर शेतकऱ्यांच्या असंतोषाचे आव्हान अधिकच तीव्र होत आहे.
“तृप्ती व्हिला” हे जाळून टाकण्याची धमकी
पुढे आलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या गावातील शेतकरी विशाल सुधाकर मुरुख यांच्या शेतात 2024 साली अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं. त्यांनी वेळोवेळी संग्रामपूर तहसील कार्यालयात कागदपत्रे ही जमा केली होती. त्यांचं बँक अकाउंट केवायसी ही केलं होतं. मात्र तरीही शेतीचे नुकसान भरपाई रक्कम न मिळाल्याने या संतप्त शेतकऱ्यांने जळगाव जामोद चे भाजपा आ. संजय कुटे यांना आधी समाज माध्यमात त्यांच जळगाव जामोद येथील निवासस्थान “तृप्ती व्हिला” हे जाळून टाकण्याची धमकी दिली होती.
यालाच अनुसरून या शेतकऱ्याने काल रात्री संजय कुटे यांच्या निवासस्थानी जाऊन निवासस्थानात प्रवेश मिळवून संजय कुटे यांचे निवासस्थान जाण्याचा प्रयत्न केला. मात्र समयसुचकता दाखवत संजय कुटे यांच्या स्वीय सहायकाने या शेतकऱ्याला वेळीच पकडल्याने पुढील अनर्थ टळला.
शेतकऱ्यावर गुन्हा दाखल, शेतकरी अटकेत
याप्रकरणी संजय कुटे यांच्या स्वीयसहायकाने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार जळगाव जामोद पोलिसांनी शेतकरी विशाल मुरुख याच्यावर बी एन एस 333 , 351(2) नुसार गुन्हा दाखल करत या शेतकऱ्याला अटक केली आहे. या संपूर्ण घटनेनंतर मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नासह लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा प्रश्नही अधोरेखित झाला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
https://www.youtube.com/watch?v=H8IKz66uitq
आणखी वाचा
Comments are closed.