हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप तुरुंगात
पुणे : शहरातील गाजलेल्या पोर्शे अपघात (Accident) प्रकरणातील आरोपी विशाल अगरवाला पुन्हा एकदा जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे, विशाल अगरवालचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. पुणे पोर्शे कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. मात्र, याप्रकरणी आपल्या मुलाला वाचविण्यासाठी बांधकाम उद्योगपती असलेल्या विशाल अगरवालने वैद्यकीय अहवालात छेडछाड केल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे, मुंबई उच्च न्यायालयाने (Highcourt) पुन्हा आरोपी विशाल अगरवालचा जामीन फेटाळला आहे. गेल्या 17 महिन्यांपासून विशाल अगरवाल जेलमध्ये आहे.
पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉ.अजय तावरेंचा जामीन सुद्धा न्यायालयाने फेटाळला आहे. 19 मे 2024 रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात एका भरधाव पोर्शे कारने 2 जणांचा जीव घेतला होता. संबंधित कारचालक हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आलं होतं. मद्यप्राशन केलेल्या मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी कारचालक आरोपी मुलाचा बाप असलेल्या विशाल अगरवालने कारस्थान रचले होते. त्यामुळे, 21 मे 2024 रोजी विशाल अगरवाल याला पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती.
2 पोलीस अधिकारी शासकीय सेवेतून बडतर्फ
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडूनही गैरवर्तन आणि निष्काळजीपणा करण्यात आल्याचे समोर आले होते. तसेच, आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. त्यामुळे, याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलिस ठाण्याचे 2 अधिकारी शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहेत.
कधी घडला अपघात
19 मे 2024 च्या रात्री पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका हाय-स्पीड पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अभियंत्यांना धडक दिली होती. दोन्ही अभियंते (अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया) यांचा या अपघातात जागीच मृत्यृ झाला होता. अपघाताच्या वेळी गाडी चालवणारा तरूण हा 17 वर्षे आणि 8 महिन्यांचा होता आणि तो दारू पिलेला होता. पुणे पोलिसांनी त्याला प्रौढ म्हणून वागवण्याची मागणी केली होती, कारण तो 18 वर्षांपेक्षा फक्त 4 महिने कमी वयाचा होता.
अपघातानंतर काय घडलं?
सुरुवातीला पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला होता, परंतु जेव्हा आरोपी दारू पिऊन असल्याचे उघडकीस आले तेव्हा प्रकरण गंभीर झाले. सुरुवातीला, बाल न्याय मंडळाने (जेजेबी) अवघ्या 14 तासांत आरोपीला 100 शब्दांचा निबंध, ‘समाजसेवा’ आणि ‘अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे’ अशा अटी घालून जामीन मंजूर केला होता. यामुळे देशभरात संताप आणि संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर झालेल्या टीकेनंतर प्रकरण जोरदार चर्चेत आलं होतं.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.