Sanjay Shirsat made a statement that he cannot give 2100 to his beloved sisters


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली होती. या योजनेतून निवडणुकीपूर्वी अडीच कोटींहून अधिक महिलांना दरमहा 1500 रुपये हप्ता मिळाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकराने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. महाराष्ट्र सरकारच्या महसुलात वाढ झाल्यावर 2100 रुपये दिले जातील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी आदिवासी विकास खात्यातील आणि सामाजित न्याय व विशेष सहाय्य विभागाचे पैसे वळवळ्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता त्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. (Sanjay Shirsat made a statement that he cannot give 2100 to his beloved sisters)

लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटींपैकी 410 कोटी 30 लाख रु. वळवण्यात आले. यासंबंधिचा शासन निर्णय 2 मे रोजी जारी करण्यात आला. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, जवळपास सव्वाचारशे कोटी वर्ग करण्यात आले आहेत आणि याची मला कल्पना व माहिती नाही. सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल तर खातं बंद केले तरी चालेल. याबाबत मी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेल. कारण फायनान्स डिपार्टमेंट आपली मनमानी चालवत आहेत. आपण म्हणू तेच खरं करत आहेत. माझ्या खात्याचा निधी कायदेशीरीत्या वर्ग करता येत नाही आणि कट करता येत नाही. पण फायनान्स डिपार्टमेंटवाले आपले डोके जास्त चालवत असतील तर हे बरोबर नाही, अशा शब्दात शिरसाट यांनी संताप व्यक्त केला होता. यानंतर आता त्यांनी 2100 रुपयांबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

हेही वाचा – Beed : महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडीत, संतापलेल्या नागरिकांकडून अजितदादांच्या फोटोला अभ्यंग स्नान

काय म्हणाले संजय शिरसाट?

पत्रकारांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले की, राज्याची आर्थिक कशी बसवायची हा वरिष्ठ पातळीवरील विषय आहे. पण 1500 चे 2100 करू शकत नाही, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. पण अनेक जण लाडकी बहीण योजनेचा वेगळ्या अर्थाने बाऊ करताना दिसत आहेत. ही योजना बंद होणार का? योजनेला पैसे कमी मिळणार का? पण तसे काहीही होणार नाही. या योजनेला आम्ही पैसे देणार आहोत. तो आमचा शब्द आहे आणि आम्ही तो पूर्ण करणार आहोत. परंतु सध्या राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार आलेला आहे. त्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. भले कर्ज काढावं लागेल. पण आम्हाला लाडकी बहीण योजना बंद करता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Congress VS BJP : जुगारात तीन कोटी लगेच संपले, तशी काँग्रेस संपणार नाही; गायकवाड यांचा बावनकुळेंवर हल्लाबोल



Source link

Comments are closed.