गडचिरोलीत पूरग्रस्त आणि दुर्गम भागात आरोग्य सेविकेची तब्येत खालावली, प्रशासनाने हेलिकॉप्टरमधून एअरलिफ्ट करत वाचवले प्राण

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यात दुर्गम भागात एका आरोग्य सेविका महिलेची तब्येत खालावली होती. पोलिसांनी तत्काळ हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करत या महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे.
गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे परलकाटा नदीला पूर आला होता. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 112 गावांचा संपर्क तुटला होता. यामध्ये अरेवाडा गावातील अंगणवाडी सेविका सीमा बंबोळे अडकल्या होत्या. त्या गंभीर आजारी पडल्या होत्या आणि त्यांना तातडीच्या उपचारांची गरज होती, मात्र दुर्गम भागात सुविधा उपलब्ध नव्हत्या.
पुरामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडे मदत मागण्यात आली. तेव्हा तत्काळ गडचिरोली पोलिसांनी पवनहंस हेलिकॉप्टरची मदत घेतली. डीआयजी श्रीनिवास आणि सहपायलट आशीष पॉल यांनी प्रतिकूल हवामान असूनही हेलिकॉप्टर भामरागडमध्ये पोहोचवले.
सीमा बंबोळे यांना गडचिरोली येथे आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. या हवाई बचाव मोहिमेसाठी पोलिस, जिल्हा प्रशासन आणि महसूल विभाग यांच्यात सुसंवाद आणि समन्वय साधण्यात आला. भामरागड पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मदत करून ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रयत्न केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Comments are closed.