वैभव सूर्यवंशीची आज खरी कसोटी! गुजरात-राजस्थान यांच्यात तुल्यबळ लढत
राजस्थान रॉयल्सचा विस्पह्टक फलंदाज वैभव सूर्यवंशीची आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत उद्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात खरी कसोटी लागणार आहे. गुजरात टायटन्सकडे पॅगिसो रबाडा, प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांसारखा भेदक वेगवान गोलंदाजी हल्ला असल्याने हा सामना अधिकच रंगतदार ठरणार आहे.
केवळ 15 वर्षांच्या सूर्यवंशीने आपल्या दुसऱया आयपीएल हंगामाची धमाकेदार सुरुवात केली होती. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्याने अवघ्या 15 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत 127 धावांचे लक्ष्य सहज गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता नरेंद्र मोदी स्टेडियम येथे तो पुन्हा आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न करेल, मात्र गुजरातच्या गोलंदाजांसमोर त्याची खरी परीक्षा असेल. या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याच्याकडून अधिक चांगल्या रणनीतीची अपेक्षा असेल. पंजाब किंग्ज विरुद्धच्या पराभवात त्याच्या काही निर्णयांवर टीका झाली होती. विशेषतः सिराजला दोन षटके देणे आणि प्रसिधला उशिरा गोलंदाजीस आणणे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
राजस्थान रॉयल्स संघ कागदावर मजबूत दिसत असला तरी रियान पराग याला कर्णधार बनवण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जाडेजा यांसारख्या खेळाडूंना दुय्यम स्थान दिल्याची चर्चा आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत आठ सामने झाले असून त्यापैकी सहा सामन्यांत गुजरातने विजय मिळवला आहे, तर राजस्थानला दोन वेळा यश आले आहे. आकडेवारीनुसार गुजरातचे पारडे जड असले तरी राजस्थानकडेही अनेक मॅचविनर खेळाडू आहेत, हे विसरता येणार नाही.
वर-3 फलंदाजांवर गुजरातची मोठी भिस्त
अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. गुजरात संघ मोठय़ा प्रमाणावर गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर या अव्वल तीन फलंदाजांवर अवलंबून आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सकडे जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांसारखे वेगवान गोलंदाज असून ते सुरुवातीच्या षटकांत गुजरातला धक्का देण्याचा प्रयत्न करतील. पंजाबविरुद्धच्या सामन्यात गिल (27 चेंडूंत 39) आणि बटलर (33 चेंडूत 38) अपेक्षित फॉर्ममध्ये दिसले नाहीत. साई सुदर्शनही दुखापतीतून परतल्यानंतर लय शोधत आहे. शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल तेवतिया यांच्या मिडल ऑर्डरवरही प्रश्नचिन्ह आहे. गुजरातने जर प्रथम फलंदाजी केली तर किमान 220 धावा उभारणे गरजेचे असेल, जेणेकरून सूर्यवंशीवर दबाव आणता येईल. लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र प्रतिस्पर्ध्याला 200 धावांच्या आत रोखणे आवश्यक ठरेल.
Comments are closed.