पंतप्रधानांच्या अपीलनंतरच पर्यटक काश्मीरला येतील

हॉटेलमालकांनी मागितली सरकारकडे मदत

पेहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरचे पर्यटन क्षेत्र अत्यंत प्रभावित झाले आहे. तर पाकिस्तानच्या गोळीबारामुळे या संकटात भर पडली आहे. केंद्रशासित प्रदेशातील पर्यटनाच्या स्थितीवर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनीही चिंता व्यक्त केली आहे. काश्मीरमधील गेस्ट हाउस, हॉटेल आणि होम स्टे रिकामी पडले आहेत. जम्मू-काश्मीर हॉटेलियर्स क्लबने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. पंतप्रधान मोदींनी नागरिकांना काश्मीरमध्ये येण्याचे आवाहन करावे, जेणेकरून केंद्रशासित प्रदेशातील पर्यटन रुळावर येईल अशी हॉटेल मालकांची इच्छा आहे.

पटनीटॉपर्यंत मर्यादित झाले पर्यटक

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाला मोठा धक्का बसला आहे. 22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात 26 पर्यटकांची हत्या झाली होती. या घटनेनंतर पर्यटकांनी काश्मीरसाठीचे स्वत:चे बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. नवे बुकिंग जवळपास बंद झाले आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे विमानतळही बंद करण्यात आले. 7 मे रोजी अमेरिकेसह अनेक  देशांनी दिशानिर्देश जारी करत स्वत:च्या नागरिकांना जम्मू-काश्मीरचा प्रवास टाळण्याची सूचना केली होती. आता जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचणारे पर्यटक पटनीटॉपर्यंतच मर्यादित झाले आहेत. हे पर्यटक काश्मीर खोऱ्यात जाणे टाळत आहे. यामुळे त्रस्त हॉटेलमालक आणि पर्यटन क्षेत्रात कार्यरत लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदतीचे आवाहन केले आहे.

देशांतर्गत पर्यटकच काश्मीरसाठी पुरेसे

काश्मीरच्या पर्यटनाला जिवंत करण्यासाठी विदेशीपेक्षा देशांतर्गत पर्यटक महत्त्वपूर्ण आहेत. काश्मीरमध्ये मागील वर्षी पर्यटनात मोठी वाढ झाली होती. जवळपास 35 लाख लोकांनी केंद्रासित प्रदेशाचा दौरा केला, ज्यात 5.11 लाख अमरनाथ यात्रेकरू सामील होते. काश्मीरमध्ये मागील काही वर्षांमध्ये शांततेमुळे लोकांनी पर्यटन अर्थव्यवस्थेत जोरदार गुंतवणूक केली आहे. मागील चार वर्षांदरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये गेस्ट हाउस आणि हॉटेल्स निर्माण करण्यात आले आहेत. दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या स्थानिक लोकांनी देखील स्वत:च्या घरांना होम स्टे आणि पर्यटन केंद्रात रुपांतरित केल्याची माहिती मुश्ताक छाया यांनी दिली.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सची घेणार मदत

भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचे आम्ही स्वागत करतो. श्रीनगरसाठी उ•ाणे लवकरच सुरू होतील अशी अपेक्षा आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. जम्मू-काश्मीरचे हॉटेलमालक देशभरातील प्रसिद्ध युट्यूबर, प्रभावशाली लोक, लेखक आणि धोरण निर्मात्यांना आमंत्रित करतील. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनी सकारात्मक भूमिका पार पाडली आहे. त्यांना काश्मीरमध्ये पर्यटनाला बळ देण्यासाठी विशेष सुविधा देण्यात येतील असे मुश्ताक छाया यांनी सांगितले.

30 लाख काश्मिरी पर्यटनावर निर्भर

सध्या 30 लाख काश्मिरी थेट स्वरुपात पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहेत. यातील 3 लाख काश्मिरी थेट हॉटेल आणि अन्य पर्यटन सुविधांमध्ये काम करत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत मोठी घट होऊनही हॉटेल्सनी कुठल्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी केलेले नाही. पर्यटक काश्मीरमध्ये परततील अशी अपेक्षा आम्हाला आहे. स्थिती सुधारेल आणि पर्यटक पुन्हा काश्मीरमध्ये येतील, आम्ही पर्यटकांचे स्वागत करण्यास तयार आहोत असे मुश्ताक छाया म्हणाले.

काश्मीर खोऱ्यात पर्यटन पुन्हा सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पर्यटन संघ पंतप्रधानांच्या भेटीसाठी वेळ मागणार आहे. देशवासीयांना काश्मीर खोऱ्यात येण्याचे आवाहन करण्याची विनंती पंतप्रधानांना करणार आहोत.

मुराइट, अध्यक्ष,

जम्मू-काश्मीर हॉटेलियर्स क्लब

Comments are closed.