पेरू आणि चिलीशी व्यापार कराराची चर्चा
दक्षिण अमेरिकेत आर्थिक प्रभावाचा विस्तार होणार : मोठी बाजारपेठ निर्यातीसाठी उपलब्ध
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताने दक्षिण अमेरिकेतील महत्त्वाचे देश पेरू आणि चिली यांच्यासोबत व्यापार कराराच्या दिशेने दोन फेऱ्यांमधील चर्चा पूर्ण केली आहे. या बैठकांमध्ये भारताचा भर या देशांसोबत व्यापक आर्थिक सहकार्य आणि दृढ व्यापारी संबंधांना चालना देणे आहे. तर भारत-पेरूमधील 10 व्या फेरीची चर्चा जानेवारी महिन्यात नवी दिल्ली येथे पार पडणार आहे. भारत-पेरूदरम्यान 9 व्या फेरीतील व्यापार करार विषयक चर्चा 3-5 नोव्हेंबर या कालावधीत लीमा (पेरूची राजधानी) येथे पार पडली आहे.
या बैठकीत वस्तू आणि सेवा व्यापार, तंत्रज्ञान अडथळे, सीमाशुल्क प्रक्रिया, व्यापार करार, महत्त्वपूर्ण खनिजे यासारख्या मुद्द्यांवर सविस्तरपणे चर्चा झाली. या व्यापार चर्चेच्या समारोप सोहळ्यात पेरूच्या विदेश व्यापार आणि पर्यटन मंत्री तेरेसा स्टेला मेरा गोमेज आणि उपमंत्री सेजर ऑगस्टो ल्योना सिल्वा उपस्थित होत्या. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संयुक्त सचिव आणि मुख्य वाटाघाटीकार विमल आनंद यांनी केले. तर पेरूमधील भारतीय राजदूत विश्वास विदु सपकाळ यांनीही यात भाग घेतला.
द्विपक्षीय व्यापार-गुंतवणुकीला मिळणार प्रोत्साहन
दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये मोठा ताळमेळ आहे आणि हा करार व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा असल्याचे उद्गार पेरूच्या मंत्री गोमेझ यांनी काढले आहेत. हा करार खनिज, फार्मा, ऑटोमोबाइल, वस्त्राsद्योग आणि अन्नप्रकिया यासारख्या क्षेत्रांमध्ये नव्या संधी निर्माण करणार असल्याचे वक्तव्य राजदूत सपकाळ यांनी पेले आहे.
चिलीसोबत तिसऱ्या फेरीची चर्चा
भारत आणि चिलीदरम्यान व्यापक आर्थिक भागीदारी करारासाठी (सीईपीए) तिसऱ्या फेरीतील चर्चा 27-30 ऑक्टोबर या कालावधीत सँटियागो येथे पार पडली आहे. बैठकीत वस्तू आणि सेवांची देवाघेवाण, गुंतवणूक, बौद्धिक संपदा अधिकार, तांत्रिक मापदंड, आर्थिक सहकार्य आणि महत्त्वपूर्ण खनिज यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही देशांनी या चर्चेला कालबद्ध पद्धतीने निष्कर्षापर्यंत पोहोचविण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार बैठकीत केला आहे. हा करार बाजारपेठेची पोहोच वाढविणे, पुरवठा साखळी मजबूत करणे आणि आर्थिक एकीकरणाला दृढ करण्याचे लक्ष्य बाळगणारा आहे.
Comments are closed.