आडोशी बोगद्यात दरड कोसळली, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात असलेल्या आडोशी बोगद्यात आज दुपारी दरड कोसळून बस आणि कारचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. दरड कोसळल्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर काही वेळ वाहतूककोंडी झाली होती. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस आणि आयआरबीचे पथक तातडीने आडोशी बोगद्यात आले. त्यांनी मार्गिकेवर पडलेला माती आणि दगडगोट्यांचा ढिगारा बाजूला हटवला. त्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकवरील वाहतूक सुरळीत झाली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील दोन्ही मार्गिकेवर आज वाहतूक सुरळीत सुरू असताना आज दुपारी अचानक बोरघाटातील आडोशी बोगद्यात दरड कोसळली. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर आडोशी बोगद्याच्या छताचे दगड आणि माती पडली. त्याचवेळी एक खासगी बस आणि एक कार मुंबईच्या दिशेने जात होत्या. बोगद्याच्या छताचे दगड आणि माती या दोन्ही वाहनांवर पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दोन्ही वाहनांमध्ये असलेल्या प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. ही दुर्घटना घडल्यानंतर मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर वाहतूककोंडी झाली. घाटात वाहनांची मोठी रांग लागली. घटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, आयआरबी यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल होत दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर केले.

या घटनेत दोन वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. दरड नव्हे तर बोगद्याच्या गन प्लास्टरचा काही भाग मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कोसळला. लागलीच ढिगारा हटविण्याचे काम सुरू केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला नाही, असे बोरघाट मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील यांनी सांगितले.

दरड कोसळण्याचे प्रकार वाढले

बोरघाट आणि परिसरात दरड कोसळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत. 19 जुलै 2015 रोजी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून पाच प्रवासी ठार तर सहा प्रवासी जखमी झाले होते. त्यानंतर खोपोली बायपास ते ढेकू गावच्या हद्दीत दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या. त्यामुळे या संपूर्ण दरड क्षेत्र भागात लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. द्रुतगती महामार्गावर दरड कोसळणार नाही याची दक्षता घेतली जात असतानाच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मंगळवारी दुपारी आडोशी बोगद्यात अचानक दरड कोसळल्यामुळे वाहनचालकांमध्ये घबराट पसरली आहे.

Comments are closed.