रायगड-रत्नागिरीला जोडणाऱ्या आंबेत पुलाखाली बार्ज आणि ड्रेझर अडकले, पुलावरील वाहतूक काही काळ बंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आधीच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुठे दरडी कोसळून तर कुठे पाणी साचल्याने अनेक रस्त्यांवरील वाहतुकीत अडथळे निर्माण झाले होते. त्यातच मंडणगड-आंबेत मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील आंबेत पुलाखाली बार्ज आणि ड्रेझर अडकून पडल्याने वाहतुकीसमोरील आणखी एका मोठ्या संकटाची भर पडली. मात्र प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे हे बार्ज आणि ड्रेझर हटविण्यात यश आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाखाली सोमवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता महाडकडून सावित्री नदीच्या पुराच्या पाण्यासोबत वाहत आलेले तीन बार्ज आणि एक ड्रेझर अडकले. पुलाच्या अगदी खाली हे बार्ज आणि ड्रेझर अडकल्याने सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि दोन्ही बाजूंनी आलेल्या वाहनांना माघारी फिरावे लागले.

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आणि रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील आंबेत या दोन गावांना जोडणारा सावित्री खाडीवरील आंबेत पूल हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या पुलामुळे मंडणगड, दापोली तसेच खेड तालुक्यातील काही गावांमधून मुंबई, पुणे आणि ठाण्याकडे जाण्याचे अंतर कमी झाले आहे. तसेच श्रीवर्धन, म्हसळा, गोरेगाव, माणगाव आदी रायगड जिल्ह्यातील तालुक्यांतील नागरिकांसह मुंबई, पुणे आणि ठाण्यातील चाकरमानी तसेच पर्यटकांना दापोली आणि मंडणगड परिसरात जाणे अधिक सोयीचे झाले आहे.

हा पूल आंबेतचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या प्रयत्नातून साकारला गेला. त्यामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना जवळचा आणि सोयीचा मार्ग उपलब्ध झाला.

महाडच्या दिशेने सावित्री नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे वाळू उपशासाठी पुलाच्या वरच्या बाजूस पावसाळ्यात नांगरून ठेवलेले तीन मोठे बार्ज आणि एक ड्रेझर पुराच्या पाण्याबरोबर वाहत येऊन पुलाखाली अडकले. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आणि कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली. परिणामी पुलाजवळ पोहोचलेल्या वाहनचालकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव माघारी फिरून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला.

दरम्यान, प्रशासनाने पुलाखाली अडकलेले बार्ज आणि ड्रेझर यशस्वीपणे हटविले. त्यानंतर पुलाची संपूर्ण सुरक्षितता तपासून खात्री करण्यात आली आणि सायंकाळी उशिरा या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

Comments are closed.