संततधार पावसामुळे मुचरी-संगमेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प; मार्गावर वाहनांच्या रांगा

संगमेश्वर तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरु असल्याने काही भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. मुचरी येथील मोरी संततधार पावसात दिसेनाशी झाली. आणि दोन्ही बाजूला वाहनांची लांबलचक रांग लागली. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र नदी, नाले, ओहळ अलोट पाण्याने वाहात आहेत. हे पुराचे पाणी आता रस्त्यावरून ओसांडून वाहू लागल्याने नागरिक चिंतेत आहेत.
काही दिवसांपूर्वी पावसाने उसंत घेतली होती. पण ऐन श्रावणात सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे तालुक्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाहनचालकांना या संततधार पावसामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पावसामुळे रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. डबकी साचली आहेत. मुळात या रस्त्यावर वाहने चालवताना कासवगतीने ती चालवावी लागतात. प्रवासाला निघताना अर्धा पाऊण तास आधीच घराबाहेर पडलेल्या या वाहन चालकांना रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने आता आणखी काही काळ पुराचे पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागणार आहे.
रस्त्यालगत असलेल्या नदी, ओहळाचे पाणी वाढलेले दिसले तर कुणीही घाईगडबडीत कोणताही घातकी निर्णय घेऊ नका. सावधगिरी म्हणून नदी, ओहळाचे पाणी रस्त्यावर आले असेल तर वाहने सुरक्षित अंतरावर थांबवून इतर वाहनचालकांना पुरस्थितीची माहिती द्यावी.आपल्या अशा जागरुकतेने इतर वाहनचालक, पर्यायी अन्य मार्गांचा अवलंब करु शकतील, गरजवंताना वेळीच मदत मिळू शकेल आणि सदरच्या मार्गावर लांबलचक रांगा लागून वेळ वाया जातो तो तुर्तास टाळता येऊ शकेल.
स्वातंत्र्य दिन पावसात
आज पहाटे पासून पावसाची संततधार सुरु असल्यामुळे संगमेश्वर तालुक्यात ठिकठिकाणी आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मोठा व्यत्यय आला. शाळा मधून मुलांना छत्र्या उघडूनच ध्वजवंदन करावे लागले. आज संगीत कवायत , समूह गीत असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, मात्र पावसामुळे विद्यार्थ्यांसह शाळा व्यवस्थापनाच्या उत्साहावर विरजण पडले.
Comments are closed.