ट्रॅफिकच्या हॉटस्पॉटवर जड वाहनांना ‘नो एण्ट्री, ऐन गर्दीच्या वेळी चाकरमान्यांची कोंडीतून सुटका
ठाणेकरांची ट्रॅफिकच्या कचाट्यातून सुटका करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. यानुसार शहरासह ठाणे जिल्ह्यातील कोंडीचे १६ हॉटस्पॉट शोधण्यात आले असून या भागात सकाळी ६ ते ११ व सायंकाळी ५ ते १० या वेळेत अवजड वाहनांना ‘नो एण्ट्री’ करण्यात आली आहे. त्यामुळे ट्रॅफिकच्या जांगडगुत्त्याला ब्रेक लागणार असल्याने नोकरी-व्यवसायानिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्यांची ट्रॅफिकच्या नाकाबंदीतून सुटका होणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १२ वाहतूक उपविभागात गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. रेल्वेचा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी किंवा काही ठिकाणांवरून प्रवासी सेवा उपलब्ध नसल्याने अनेक चाकरमानी स्वतःच्या वाहनाने प्रवास करतात. मात्र या रस्त्यांवरील खड्डे, संथ गतीने सुरू असलेली मेट्रोची व विकासकामे आणि वाहतूककोंडी यामुळे चाकरमानी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना नेहमीचा लेटमार्कला सामोरे जावे लागते. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखालची वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी अधिसूचना जारी केल्या आहेत. आज सकाळपासून जिल्ह्यातील १६ स्पॉटवर १० चाकी ट्रकसह सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त शिरसाठ यांनी दिली.
या ठिकाणी प्रवेश बंद
कोपरी उपविभाग आनंदनगर चेकनाका येथे ‘प्रवेश बंद’
कासारवडवली उपविभाग गायमुख घाट येथे ‘प्रवेश बंद’
वागळे उपविभाग मॉडेल चेकनाका येथे ‘प्रवेश बंद’
कळवा उपविभाग विटावा जकात नाका येथे ‘प्रवेश बंद’
मुंबा उपविभाग : पूजा पंजाब हॉटेल येथे ‘प्रवेश बंद’
नारपोली उपविभाग चिंचोटी वसई रोड येथे ‘प्रवेश बंद’
भिवंडी उपविभाग पारोळा फाटा येथे ‘प्रवेश बंद’
कोनगाव उपविभाग बासुरी हॉटेल सरवलीगाव येथे ‘प्रवेश बंद’
कल्याण उपविभाग बापगाव-गांधारी चौक येथे ‘प्रवेश बंद’
विठ्ठलवाडी उपविभाग: उसाटणे-नेवाळी नाका येथे ‘प्रवेश बंद’
कोळसेवाडी उपविभाग खोणी, निसर्ग हॉटेल येथे ‘प्रवेश बंद’
अंबरनाथ उपविभाग खरवई नाका येथे ‘प्रवेश बंद’
Comments are closed.