उत्तर प्रदेशात रेल्वेची धडक, 6 महिलांचा मृत्यू
मिर्झापूर येथे भीषण दुर्घटना : मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
वृत्तसंस्था/ मिर्झापूर
उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली आहे. चुनार रेल्वेस्थानकावर बुधवारी सकाळी रेल्वेतून उतरत रेल्वेमार्ग ओलांडताना कालका मेलची धडक बसल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी मृतदेहांचे अवशेष रेल्वेमार्गावरून हटवत त्यांची ओळख पटविली आहे. गोमो प्रयागराज एक्स्प्रेसमधून उतरत प्रवासी चुकीच्या दिशेने रेल्वेमार्ग ओलांडत होते, त्याचवेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून जात असलेल्या कालका मेलची धडक या लोकांना बसली, हे सर्व लोक कार्तिक पौर्णिमेनिमित्त गंगास्नान करण्यासाठी जात होते.
दुर्घटनेनंतर मृतदेह रेल्वेमार्गावरून हटवत रेल्वे पोलिसांनी त्यांची ओळख पटविली आहे. मृतांमध्ये सविता (28 वर्षे), साधना (16 वर्षे), शिव कुमारी (12 वर्षे), अप्पू देवी (20 वर्षे), सुशीला देवी (60 वर्षे), कलावती देवी (50 वर्षे) यांचा समावेश आहे. आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. घटनास्थळी पोहोचून वरिष्ठ पोलीस अधिकारी आता याप्रकरणी तपास करत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वेस्थानकावर घडलेल्या दुर्घटनेची दखल घेतली आहे. शोकाकुल परिवारांबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला वेग देण्याचा निर्देश दिला आहे. तसेच एसडीआरएफ आण एनडीआरएफच्या पथकांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करण्याची सूचना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जखमींवर योग्य उपचार करविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.
केंद्रीय मंत्र्यांकडून शोक व्यक्त
केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनीही दुर्घटनेवरून शोक व्यक्त केला. माझ्या लोकसभा मतदारसंघातील चुनार रेल्वेस्थानकावर घडलेल्या हृदयविदारक घटनेने मन अत्यंत व्यथित आहे. या दु:खाच्या क्षणी माझ्या संवेदना शोकाकुल परिवारांसोबत आहेत तसेच जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करत असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.
Comments are closed.