दिलदार ‘मार्गदर्शक’
स्वप्नील जोशी, अभिनेता
नाना पाटेकर सरांसारखा अभिनेता मिळणं, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता येणं, ही माझ्या संपूर्ण अभिनयाच्या कारकीर्दीसाठी खूप मोठी गोष्ट होती. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटामुळे ही संधी मला लाभली, हे माझं भाग्य. कारण हा माझा पहिलाच चित्रपट होता. त्या चित्रपटात नाना सर, रवीना टंडन, शिवाजी साटम, अरुणा इराणी यांच्यासारखे मोठे कलाकार होते. पार्थ घोष दिग्दर्शक होते. एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्या सगळ्यांनी मला ज्या पद्धतीने सांभाळून घेतलं, ते मी कधीच विसरू शकणार नाही.
त्या काळात नाना सर हिंदी चित्रपटसृष्टीत यशाच्या शिखरावर होते. व्यावसायिकदृष्ट्याही त्यांचं स्थान मोठं होतं. माझ्या मते ते आपल्या देशातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांचा अभिनय, भूमिकेकडे पाहण्याची दृष्टी आणि कामाबद्दलची त्यांची बांधीलकी विलक्षण होती. त्यांच्याबद्दल अनेकांच्या मनात एक प्रकारची भीती असायची. नाना सरांचा स्वभाव कडक आहे, ते रागावतात असं अनेकांना वाटायचं, पण मी त्यांना जवळून अनुभवलं होतं. माझ्याबाबतीत त्यांचा अनुभव पूर्णपणे वेगळा होता.
‘गुलाम-ए-मुस्तफा’च्या चित्रीकरणादरम्यान आम्ही जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ एकत्र काम केलं. या संपूर्ण काळात नाना सर माझ्यावर एकदाही ओरडल्याचं मला आठवत नाही. उलट त्यांनी मला प्रत्येक वेळी समजून घेतलं. एखादी गोष्ट कशी करायची, संवाद कसा म्हणायचा, प्रसंग कसा साकारायचा, याबाबत ते मला खूप मौलिक मार्गदर्शन करायचे. त्यांचा दरारा होता, पण ती आदरयुक्त भीती होती. त्यांना कामातला हलगर्जीपणा किंवा अकार्यक्षमता आवडायची नाही. आपल्याकडे सोपवलेलं काम परिपूर्ण आणि प्रभावीपणाने झालंच पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.
त्या चित्रपटाच्या चित्रीकरणात घडलेला एक प्रसंग मला आजही आठवतोय. कमालिस्तान स्टुडिओमध्ये चित्रपटासाठी खूप मोठा सेट उभारण्यात आला होता. त्यात एक संपूर्ण वस्ती तयार केली होती. पूल, रस्ते आणि घरं असा मोठा परिसर होता. त्या सेटवर एक सीन चित्रित करायचा होता. त्यात नाना सर मला बुलेट मोटरसायकल चालवायला शिकवतात. पुढे मी बुलेट चालवतो आणि नाना सर माझ्या मागे बसलेले असतात. आम्ही संपूर्ण वस्तीतून फिरत घराच्या अंगणात येतो आणि तिथे गाडी थांबवतो, असा हा सीन एकाच सलग चित्रणात घ्यायचा होता.
यामध्ये एक मोठी अडचण होती, ती म्हणजे मला त्या वेळी मोटरसायकल चालवताच येत नव्हती. त्यात बुलेटची गिअर सिस्टीम आणि ब्रेकची रचना इतर मोटरसायकलींपेक्षा वेगळी होती. त्यामुळे तो प्रसंग चित्रित करणं माझ्यासाठी अधिक कठीण होतं. दिग्दर्शक पार्थ घोष यांनी त्यावर एक पर्याय सुचवला. माझ्याऐवजी दुसऱया व्यक्तीला बुलेट चालवायला बसवायचं आणि शेवटच्या टप्प्यावर मला बसवून चित्रण पूर्ण करायचं अशी त्यांची कल्पना होती. मात्र त्यांना संपूर्ण वस्ती दाखवणारा सलग प्रसंग हवा होता.
नाना सरांना ही गोष्ट समजली. त्यांनी मला बोलावून घेतलं आणि मोटरसायकल चालवता येते का, असं विचारलं. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, मला गाडी चालवता येत नाही. त्यावर त्यांनी मला ती शिकायला सांगितली. मी त्यांना यासाठी वेळ लागेल असं सांगितलं, पण त्यांनी वेळ घेऊन शिकण्याचा आग्रह धरला. त्यांनी माझ्यासाठी प्रशिक्षकाची व्यवस्था केली. मी दोन-तीन दिवसांत बुलेट चालवायला शिकलो. तोपर्यंत त्या प्रसंगाचं चित्रीकरण पुढे ढकलण्यात आलं.
मी गाडी चालवायला शिकल्यानंतर आणखी एक प्रश्न निर्माण झाला. माझ्या मागे नाना सरांना बसवण्याऐवजी त्यांच्या जागी दुसऱया व्यक्तीला बसवावं असं ठरवलं जात होतं. कारण मी नुकताच गाडी चालवायला शिकलो होतो. चित्रीकरणादरम्यान काही अडचण निर्माण होऊ नये हा त्यामागचा विचार होता, पण नाना सरांनी त्याला नकार दिला. त्यांचा माझ्यावर विश्वास होता. मी गाडी चालवू शकतो हे मला स्वतलाही जाणवलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं.
आम्ही तो प्रसंग चित्रित केला आणि पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला! चित्रीकरण पूर्ण झाल्यावर सेटवर उपस्थित असलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नाना सरांनी मला उचलून घेतलं. तू हे करू शकतोस, असं मी तुला सांगत होतो ना, या अर्थाने त्यांनी माझं कौतुक केलं. हा प्रसंग माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता.
‘गुलाम-ए-मुस्तफा’मुळे माझ्या पुढच्या कारकीर्दीलाही वेगळी दिशा मिळाली. त्यांच्या सहवासात शिकलेल्या गोष्टी आणि त्यांनी दिलेला आत्मविश्वास मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. कलाकार नेहमीच पडद्यावरचं आणि वास्तवातलं अशी दोन आयुष्य जगत असतो. या दोन्हीही ठिकाणी ते परिपूर्ण राहणं फार कमी जणांना जमतं. नाना सरांमध्ये ते दुर्मिळत्व होतं. त्यांच्या जाण्यानं आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरचा मार्गदर्शक हरपला आहे.
Comments are closed.