पहिलीपासून हिंदीची सक्ती कदापि मान्य नाही! त्रिभाषा समिती अध्यक्ष नरेंद्र जाधव ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितले

शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेला हरकत नाही, पण पहिलीपासून हिंदीची सक्ती कदापि मान्य नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज त्रिभाषा समितीला ठासून सांगितले. त्रिभाषा समितीचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र जाधव यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी मराठी सक्तीची अंमलबजावणी प्रभावीपणे करा, हिंदीची सक्ती असताच कामा नये अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.
शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा अवलंब करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाचा आधार सरकारकडून घेतला जात आहे. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करायची असा डाव आहे. त्याला शिवसेना आणि मराठीप्रेमींनी तीव्र विरोध केल्यानंतर सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा समिती नेमली आहे. ही समिती संबंधित सर्वांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेत आहे. नरेंद्र जाधव यांनी त्याच अनुषंगाने आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव यांनी ‘मातोश्री’बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘हिंदीची सक्ती करण्यासाठीच त्रिभाषा समिती नेमण्यात आली असा उद्धव ठाकरे यांचा समज झाला होता, परंतु तसे काहीही नाही अशी ग्वाही आपण त्यांना दिली. त्रिभाषा धोरण व शालेय शिक्षणातील अनेक बाबींवर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर विस्तृत आणि समाधानकारक चर्चा झाली. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत हिंदीची पहिलीपासून सक्ती असता कामा नये हा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी ठासून मांडला,’ असे नरेंद्र जाधव यावेळी म्हणाले.
30 डिसेंबरपर्यंत अहवाल देणार
त्रिभाषा समिती या मुद्दय़ावर लोकभावना जाणून घेत आहे. त्यासाठी उद्या नाशिकला आणि 13 नोव्हेंबरला पुणे येथे जाणार असल्याचे नरेंद्र जाधव यांनी सांगितले. 30 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचा समितीचा प्रयत्न राहील असेही त्यांनी सांगितले. निवडणूक आचारसंहितेमुळे आपल्याला जास्त बोलता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.