तृणमूल काँग्रेस घुसखोरांना संरक्षण देत आहे.
पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल : केंद्र सरकारच्या पैशाचा दुरुपयोग होत असल्याचाही आरोप
सर्कल/कोलकाता, मालदा
पश्चिम बंगालमधील मालदा येथील एका सभेत पंतप्रधान मोदींनी शनिवारी केंद्र सरकारच्या योजना, भाजपचा विस्तार यावर प्रकाश टाकत एक मोठा राजकीय संदेश देतानाच तृणमूल काँग्रेस सरकारवर तीव्र हल्ला चढवला. बंगालमधील प्रत्येक गरीब कुटुंबाला कायमचे घर असावे, प्रत्येक गरजू व्यक्तीला मोफत रेशन मिळावे आणि केंद्र सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचे पूर्ण लाभ गरिबांपर्यंत पोहोचावेत अशी आपली इच्छा आहे. पण दुर्दैवाने, बंगालमध्ये असे घडत नाही, असे सांगत केंद्र सरकारकडून राज्याला मिळणाऱ्या पैशाचा बंगालमधील सरकारकडून दुरुपयोग होत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.
घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान मोदींनी तृणमूल काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला. तृणमूल काँग्रेसचे नेते केंद्र सरकारने गरिबांसाठी पाठवलेले पैसे लुटत आहेत. लोकांचे हक्काचे असलेले पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, असेही पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितले. बांगलादेशी घुसखोर स्थानिक लोकांचे हक्क हिरावून घेत आहेत. भाजप सरकार स्थापन होताच सर्व घुसखोरांवर कारवाई केली जाईल आणि बंगालमधील लोकांच्या हक्कांचे आणि विशेषाधिकारांचे रक्षण केले जाईल, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार अत्यंत असंवेदनशील आणि क्रूर वृत्ती स्वीकारत असल्याचा आरोप केला.
आयुष्मान भारत योजनेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, तृणमूल काँग्रेसच्या लोकांना तुमच्या दु:खाची पर्वा नाही. ते आपली तिजोरी भरण्यात व्यस्त आहेत. बंगालमधील गरीब लोकांनाही देशातील इतर भागांप्रमाणे 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळावेत अशी माझी इच्छा आहे, पण ही योजना येथे लागू केलेली नाही. बंगालमधून अशा निर्दयी सरकारला हद्दपार करणे खूप महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. आपला देश 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने काम करत असून पूर्व भारताचा विकास खूप महत्वाचा आहे. पूर्व भारत दशकांपासून द्वेष पसरवणाऱ्यांच्या ताब्यात होता. आता भाजपने पूर्व भारताला द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांपासून मुक्त केले आहे. आता पूर्व भारतातील लोकांचा भाजपवर विश्वास प्रबळ होत असल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत ह्या राज्यातही भाजपच्या हाती सत्ता येईल, असा आशावाद पंतप्रधानांनी क्यक्त केला.
बिहार काबीज, आता बंगालकडे मोर्चा : मोदी
बिहार निवडणुकीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये भाजप-एनडीए सरकार स्थापन झाले. याचा अर्थ बंगालच्या सभोवतालच्या सर्व दिशेने भाजपचे सरकार आहे, जे सुशासन देत आहे. आता बंगालची वेळ आली आहे. म्हणूनच, बिहार निवडणुकीतील विजयानंतर मी गंगा आईच्या आशीर्वादाने बंगालमध्येही विकासाची नदी वाहेल असे म्हटल्याचा दाखला पंतप्रधानांनी दिला. तसेच ओडिशात पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. त्रिपुरामध्ये जनता गेल्या अनेक वर्षांपासून भाजपवर विश्वास व्यक्त करत आहे. गेल्या निवडणुकीत आसामने भाजपला पाठिंबा दिला होता. केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्येही भाजपचा उमेदवार महापौर झाल्याचा संदर्भ देत भाजपच्या वाढत्या विस्तारावर प्रकाशझोत टाकला.
महाराष्ट्रातील विजयाचा संदर्भ
मालदामधील सभेत पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील भाजपच्या घवघवीत यशाचाही संदर्भ दिला. महाराष्ट्रातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. विशेषत: महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत भाजपने पहिल्यांदाच सत्ता काबीज केली. ज्या भागात निवडणुका जिंकणे भाजपसाठी एकेकाळी अशक्य मानले जात होते, तिथेही आता पक्षाला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. यावरून देशातील मतदार, ज्यात जनरेशन झेडचाही समावेश आहे, भाजपच्या विकास मॉडेलवर किती विश्वास ठेवतात हे दिसून येते, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
राज्याला बहुमूल्य भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदा येथे भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उद्घाटन केले. त्यांनी हावडा आणि गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी ट्रेन चालकाची भेट घेतली आणि ट्रेनबद्दल जाणून घेतले. पंतप्रधानांनी प्रवाशांशीही संवाद साधला. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमध्ये 3,250 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे उद्घाटनही केले. त्यांनी चार अमृत भारत एक्स्प्रेस गाड्यींनाही व्हर्च्युअल पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. या गाड्या उत्तर बंगालमधील न्यू जलपाईगुडी आणि अलीपुरद्वारला भारताच्या इतर भागांशी जोडतील.
Comments are closed.