तृणमूलला पराभवाचा सामना करावा लागला.
भाजप नेते दिलीप घोष यांनी केला आरोप
वृत्तसंस्था / कोलकाता
तृणमूल काँग्रेसला आपला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे त्या पक्षाने ‘सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षण’ अभियानाला विरोध केला आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल शाखेचे ज्येष्ठ नेते आणि आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवार दिलीप घोष यांनी केला आहे. ते एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या मुलाखत कार्यक्रमात शनिवारी मतप्रदर्शन करत होते. यावेळी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला विजयाची सुसंधी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तृणमूल काँग्रेस मुख्य मुद्द्यांपासून भरकटली असल्याचा आरोप त्यांनी केला.
पश्चिम बंगालच्या मतदारसूचीत मोठ्या प्रमाणात बांगला देशातून बेकायदेशीरपणे आलेल्या घुसखोरांची नावे घुसडण्यात आली होती. या कामी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पुढाकार घेतला होता. हा पक्ष घुसखोरांच्याच मतांवर अवलंबून आहे. आता पुनर्सर्वेक्षणात घुसखोरांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे तृणमूल काँग्रेस पक्ष आकांडतांडव करीत आहे. त्याच्या मतांचा मुख्य आधारच तुटला आहे. त्यामुळे तो पक्ष धास्तवला असल्याचे प्रतिपादन घोष यांनी केले आहे.
वगळली 91 लाख नावे
पश्चिम बंगालच्या मतदारसूचीतूत जवळपास अवैध मतदारांची जवळपास 91 लाख नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे यावेळच्या मतदारसूचीत साधारणत: 6 कोटी 75 लाख नावे उरली आहेत. पुनर्सर्वेक्षणाचे अभियान हाती घेण्यात आले, तेव्हा मतदारांची संख्या 7 कोटी 66 लाख इतकी होती. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत नोंदणीकृत मतदारांची संख्या साधारणत: 7 कोटी 32 लाख इतकी होती. त्यामुळे या निवडणुकीत मतदारसंख्या मागच्या निवडणुकीपेक्षाही कमी आहे.
त्यावेळी नव्हता आक्षेप
2002-2003 या वर्षीही पश्चिम बंगालमध्ये ‘सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षण’ अभियान, अर्थात एसआयआर हाती घेण्यात आले होते. तथापि, त्यावेळी ममता बॅनर्जी किंवा तृणमूल काँग्रेस यांनी त्या अभियानाला आक्षेप घेतला नव्हता. मग आत्ता तो का घेण्यात येत आहे, असा टोकेरी प्रश्न दिलीप घोष यांनी या मुलाखतीत उपस्थित केला. तृणमूल तणावात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
Comments are closed.