तृणमूलच्या नेत्याने कार्यालयातच गळफास घेतला.
बीरभूम: पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आशीष बॅनर्जी यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल कार्यालयात त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. आशीष बॅनर्जी हे रामपुरहाट येथे राहत होते, त्यांच्या घरानजीकच तृणमूल काँग्रेसचे पक्ष कार्यालय होते.
पोलिसांना रविवारी कार्यालयातून एक सुसाइड नोट मिळाली असून त्यात मी भ्रष्टाचार केला नाही, तरीही बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचे बॅनर्जी यांनी नमूद केले आहे. बॅनर्जी यांनी सुसाइड नोटमध्ये वाळूच्या एका निविदेचा उल्लेख केला आहे. कुठल्याही कामाच्या बदल्यात मी पैसे घेतले नाहीत. टीआरडीएची (तारापीठ-रामपुरहाट डेव्हलपमेंट अथॉरिटी) निविदा, योजना मंजूर करणे, एनओसी अन् चेकशी निगडित प्रकरणांमध्ये माझी कुठलीच भूमिका नसल्याचा दावा सुसाइड नोटमध्ये करण्यात आला आहे. माझ्या मृत्यूसाठी कुणीच जबाबदार नाही, राजकारणात उतरण्याचा निर्णयच चुकीचा होता असेही पत्रात म्हटले गेले आहे. बंगालच्या मंत्री अग्निमित्रा पॉल यांनी ही आत्महत्या आहे का हत्या याचा तपास पोलीस करणार असल्याचे सांगितले आहे. तृणमूल काँग्रेसमधील सर्व लोक वाईट नाहीत असे मी म्हणेन. बहुधा काही चांगले लोक अद्याप त्या पक्षात असावेत असेही पॉल यांनी म्हटले आहे. जीवनभर शिक्षक अन् जनसेवक राहिलेले आशीष बॅनर्जी यांनी प्रामाणिकपणे, सन्मान अन् साधेपणासह लोकांची सेवा केली. ते रामपूरहाट अन् बीरभूमच्या सन्मानित लोकांपैकी एक होते असे म्हणत तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी कथित बदनाम करण्याच्या अभियानावरून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Comments are closed.