त्याचा पाठलाग करताना त्रिनमूलच्या आमदाराला अटक केली

वृत्तसंस्था / मुर्शिदाबाद

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास करणाऱ्या ईडीने सोमवारी तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवनकृष्ण साहा यांना अटक केली आहे. ईडीचे पथक मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बुरवान येथील त्यांच्या निवासस्थानी छाप्यासाठी पोहोचल्यावर आमदाराने भिंतीवरून उडी घेत पलायनाचा प्रयत्न केला, यादरम्यान ईडीच्या पथकाने पाठलाग करत त्यांना पकडले आहे. कृष्ण साहा यांना पलायन करताना शेतात ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्यांचे कपडे चिखलाने माखलेले होते. छाप्यादरम्यान आमदाराने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला आणि स्वत:चा मोबाइल तलावात फेकला. परंतु ईडीच्या पथकाने तलावातून त्यांचे दोन्ही मोबाइल बाहेर काढत ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविले आहेत.

ही कारवाई बीरभूम येथील एका इसमाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर करण्यात आली. या इसमाने शिक्षक भरती घोटाळ्याशी निगडित देवाणघेवाणीचा खुलासा केला होता. हा इसम ईडीच्या पथकासोबत तृणमूल काँग्रेसच्या आमदाराच्या निवासस्थानी पोहोचला होता. ईडीच्या पथकाने कृष्ण साहा यांच्या मुर्शिदाबाद येथील निवासस्थानासह रघुनाथगंजमधील त्यांचे नातेवाईक आणि बीरभूम येथील त्यांच्या वैयक्तिक सचिवाच्या निवासस्थानीही छापे टाकले आहेत. आमदाराची चौकशी केली जात असून त्यांना कोलकाता येथे नेण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.

यापूर्वी साहा आणि त्यांच्या परिवाराची याप्रकरणी चौकशी झाली आहे. ईडीने यापूर्वी त्यांच्या पत्नीलाही काही प्रश्न विचारले आहेत. तर सीबीआयने एप्रिल 2023 मध्ये तृणमूल आमदाराला शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. मे 2023 मध्ये त्यांना जामीन मिळाला होता. शिक्षक भरती घोटाळ्यात ईडी मनी लॉन्ड्रिंगच्या पैलूंचा तपास करत आहे. तर सीबीआय गुन्हेगारी कनेक्शनचा तपास करत आहे

Comments are closed.