टिटवाळ्यात ट्रकचा ब्रेक फेल; अनेक गाड्यांना चिरडले; सुदैवाने जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ब्रेक फेल भरधाव ट्रकचा थरार आज टिटवाळावासीयांनी अनुभवला. नेहमी गर्दीने गजबजलेल्या गणेश मंदिर रोडवर सकाळी ब्रेक फेल मालवाहू ट्रकने १० ते १२ वाहनांना धडक देत चिरडले. या दुर्घटनेत काही वाहनधारक किरकोळ जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला असून ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

बल्याणीच्या दिशने टिटवाळा पूर्वेकडून स्टेशनच्या दिशेने मालवाहू ट्रक येत असताना सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली. गणेश मंदिर या मुख्य रस्त्यावरील बिकानेर मिठाई शॉपसमोर आल्यानंतर ट्रकचा ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्यानंतर चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले. यानंतर या ट्रकने अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. ट्रकने काही दुचाकी, रिक्षा, कार यासह अन्य वाहनांना चिरडत ट्रक थेट गणेश मंदिर रोडवरील पटेल मार्ट परिसरात येऊन थांबला. अपघातात अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही वाहनचालकदेखील यात जखमी झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी भरधाव ब्रेक फेल ट्रकने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला. या अपघातामुळे गणेश मंदिर रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.

चालक नशेत होता का?
ट्रकचा ब्रेक फेल झाला होता की चालक दारूच्या नशेत होता, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलीस यंत्रणा या दोन्ही शक्यतांची चौकशी करत असून चालकाची वैद्यकीय तपासणी करून नशेची खातरजमा केली जाणार आहे. तसेच ट्रकची तांत्रिक तपासणी करून ब्रेक प्रणालीमध्ये बिघाड होता का, याचाही सखोल तपास केला जाणार आहे.

डिव्हायडरमुळे वाचले जीव
ब्रेक फेल ट्रक वाहनांना चिरडत पुढे जात असताना नागरिकांची एकाच पळापळ झाली. ट्रक एका डिव्हायडरला जाऊन आदळला आणि थांबला, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. नुकसानग्रस्त वाहनधारकांनी ट्रकचालकाला ताब्यात घेत एकच गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Comments are closed.