एपस्टीन फाईल्स वादादरम्यान ट्रम्प यांनी उचलले मोठे पाऊल, ॲटर्नी जनरल पाम बाँडी यांना पदावरून हटवलं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी एक अत्यंत मोठा निर्णय घेत अ‍ॅटर्नी जनरल पाम बाँडी यांची त्यांच्या पदावरून हटवलं. गेल्या काही दिवसांपासून एपस्टीन फाईल्स हाताळणीवरून पाम बाँडी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. अखेर ट्रम्प यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवत प्रशासनात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

पाम बाँडी या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत विश्वासू आणि दीर्घकाळापासूनच्या सहकारी मानल्या जात होत्या. मात्र अ‍ॅटर्नी जनरल म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांच्या कामाच्या पद्धतीवर आणि निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. विशेषतः एपस्टीन फाईल्स सार्वजनिक करण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर मोठा दबाव होता. या फाईल्समधील संवेदनशील माहिती आणि संबंधित व्यक्तींच्या नावांच्या प्रकटीकरणावरून त्यांच्या भूमिकेवर गंभीर टीका झाली होती. याच वादाची परिणती त्यांच्या हकालपट्टीमध्ये झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

केवळ एपस्टीन प्रकरणच नाही, तर ट्रम्प यांच्या राजकीय अजेंड्याची आणि कायदेशीर लढाईची अंमलबजावणी करण्यात बाँडी अपेक्षित यश मिळवू शकल्या नाहीत, अशीही चर्चा अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील अस्थिरता पुन्हा एकदा समोर आली असून, येणाऱ्या काळात न्याय विभागाच्या कामकाजात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments are closed.