एका रात्रीत संपूर्ण इराणला नष्ट करू शकतो, ती मंगळवारची रात्र असू शकते! ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा

होर्मुझ सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली करण्यासाठी इराणला 48 तासांचा वेळ देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इशारा दिला की, अमेरिका एका रात्रीत संपूर्ण इराण नष्ट करू शकते आणि ती रात्र मंगळवारची असू शकते.

‘संपूर्ण देश (इराण) एका रात्रीत संपवला जाऊ शकतो. ती उद्याची रात्र असू शकते’, असे ट्रम्प म्हणाले.

तेहरानने करार केला नाही किंवा ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा खुली केली नाही, तर इराणमधील वीज प्रकल्प, पूल आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याची धमकी ट्रम्प यांनी याआधी दिली होती. तसेच त्यांनी अर्वाच्य भाषेचा देखील वापर केला होता. त्यानंतर आता त्यांचे हे विधान आले आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ‘इराणमध्ये मंगळवार हा ‘पॉवर प्लांट डे’ आणि ‘ब्रिज डे’ असेल. यापूर्वी असे कधीही घडले नसेल!!! ती सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर तुम्ही नरकात जगाल – फक्त पाहत राहा! प्रेज बी टू अल्लाह (Praise be to Allah).’

यानंतर त्यांनी एक पोस्ट टाकून त्यांच्या अंतिम मुदतीची नेमकी वेळही त्यामध्ये नमूद केली होती.

सोमवारी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, इराणचे वीज प्रकल्प आणि पूल उद्ध्वस्त करण्याच्या त्यांच्या आधीच्या धमक्यांपेक्षाही अधिक कठोर पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

‘त्यांच्याकडे ना पूल उरतील, ना वीज प्रकल्प, ना काहीही. मी यापेक्षा जास्त काही बोलणार नाही, कारण या दोन गोष्टींपेक्षाही वाईट अशा इतर गोष्टी आहेत’, असे ट्रम्प म्हणाले.

युद्धबंदीचा प्रस्ताव ‘पुरेसा नाही’

युद्ध संपवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या देशांनी ४५ दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव मांडल्याचे ट्रम्प यांनी मान्य केले. त्यांनी याला एक महत्त्वाचे पाऊल म्हटले, मात्र हा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला नाही.

Comments are closed.