माझ्या विरोधात बातम्या देणाऱ्या चॅनेलचे परवाने रद्द होऊ शकतात! ट्रम्प यांचा टीव्ही चॅनेलना इशारा, अमेरिकेत चौथास्तंभ धोक्यात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही टीव्ही चॅनेलचे परवाने काढून घेण्यात येऊ शकतात असा इशारा दिला आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही होस्ट जिमी किमेलला निलंबित केल्यानंतर त्यांचे विधान समोर आले आहे.

एबीसी (ABC) नेटवर्कने जिमी किमेल या आपल्या टीव्ही चॅनेलच्या होस्टला कामावरून काढून टाकल्याचे जाहीर केले. किमेलने एका कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांचा उजवा हात मानले जाणारे 31 वर्षीय तरुण नेते चार्ली कर्क यांच्या हत्येबद्दल वादग्रस्त विधान केले होते. याच घटनेनंतर जिमीला निलंबित करण्यात आले. किमेलने या हत्येसाठी रिपब्लिकनचा हात असल्याचा आरोप केला होता, मात्र पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला डाव्या विचारसरणीचा (leftist ideology) समर्थक असल्याचे म्हटले होते. किमेलच्या या टिप्पणीमुळे अमेरिकेची प्रसारण नियामक संस्था फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने (FCC) एबीसीला कारवाईचा इशारा दिला.

यूकेच्या दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांनी विमानात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मी वाचले आहे की ९७ टक्के चॅनेल माझ्या विरोधात होते, तरीही मी गेल्या वर्षीच्या निवडणुकीत सातही ‘स्विंग स्टेट्स’मध्ये सहज जिंकलो. जे माझ्याबद्दल नकारात्मक गोष्टी दाखवतात, मला असं सूचवावं वाटतं की त्यांचा परवाना काढून घ्यावा’.

जिमी किमेलने आपल्या कार्यक्रमात म्हटले होते की, ‘मागा गँग’ ही हल्लेखोर आपल्यापैकी एक नसल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.

एफसीसीचे अध्यक्ष ब्रेंडन कार यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना सांगितले की, किमेलचे निलंबन ही केवळ सुरुवात आहे. ते म्हणाले, ‘आम्ही या प्रसारकांना सार्वजनिक हितासाठी जबाबदार धरत राहू. जर त्यांना हे मान्य नसेल तर ते आपला परवाना एफसीसीकडे परत करू शकतात.’

कायद्याच्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या संविधानातील ‘फर्स्ट अमेंडमेंट’ (First Amendment) मुक्त भाषणाचे संरक्षण करते. त्यामुळे राजकीय मतभेदांमुळे एफसीसीला कोणत्याही चॅनेलचा परवाना रद्द करता येणार नाही.

Comments are closed.