आमच्याशी गेम खेळाल तर जबर किंमत मोजावी लागेल! टॅरिफवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
‘अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने टॅरिफच्या संदर्भात दिलेल्या निर्णयाच्या आडून कोणी आमच्याशी गेम खेळण्याचा प्रयत्न केला आणि व्यापार करारात मान्य केलेल्या टॅरिफवरून माघार घेतली तर त्या देशाला जबर किंमत मोजावी लागेल. कडक व्यापारी निर्बंधांना सामोरे जावे लागेल,’ असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिला.
ट्रम्प यांनी दुसऱयांदा सत्तेवर येताच अनेक देशांवर 150 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावले. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हे मनमानी टॅरिफ रद्द केले. त्यानंतर ट्रम्प यांनी एका कायद्याचा आधार घेत सर्वच देशांवर सरसकट 15 टक्के टॅरिफ लावले आहे. त्यामुळे तेवढेच टॅरिफ द्यावे लागेल असे अनेक देशांना वाटत आहे, मात्र या देशांना ट्रम्प यांनी पुन्हा धक्का दिला आहे.
हिंदुस्थानकडे रोख
टथ सोशलवर लिहिलेल्या नव्या पोस्टमधून ट्रम्प यांनी आज पुन्हा एकदा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयावर टीका केली. ‘कोर्टाचा निर्णय हास्यास्पद आहे. त्याचा आधार घेऊन कोणी व्यापार करारातून माघार घेत असेल तर ते चालणार नाही. ज्यांनी वर्षानुवर्षे अमेरिकेला फसवले आहे, त्या देशांनी तर अजिबात भ्रमात राहू नये, असे ट्रम्प यांनी सुनावले. व्यापार करारात हिंदुस्थावर 18 टक्के टॅरिफ लावण्यात आले आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा रोख हिंदुस्थानकडे असल्याचे बोलले जात आहे.
Comments are closed.