अमेरिका म्हणजे युरोपची पिगी बँक नाही, अमेरिकन टेक कंपन्यांवरील दंडावरून ट्रम्प यांचा युरोपीय महासंघाला इशारा
अमेरिकेतील आघाडीच्या टेक कंपन्यांवर युरोपीय महासंघाकडूनलादण्यात येणाऱ्या अब्जावधी डॉलर्सच्या दंडावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. “अमेरिका ही युरोपची पिगी बँक नाही,” अशा शब्दांत संताप व्यक्त करत ट्रम्प यांनी युरोपीय महासंघाच्या व्यापार धोरणांची औपचारिक चौकशी सुरू करण्याचे आदेश शुक्रवारी दिले आहेत. युरोपीय महासंघाने नुकताच गुगलवर सुमारे एक अब्ज डॉलरचा (८९ कोटी युरो) दंड ठोठावला होता. या कारवाईचे तीव्र पडसाद आता उमटू लागले असून, ट्रम्प यांनी युरोपीय महासंघाला कठोर कारवाईचा आणि मोठ्या आयात शुल्काचा (टॅरिफ) थेट इशारा दिला आहे.
गुगलने प्ले स्टोअर आणि सर्च इंजिनच्या माध्यमातून ग्राहकांना स्वतःच्याच सेवांकडे वळवून बाजारातील निकोप स्पर्धेचे नुकसान केल्याचा ठपका युरोपीय महासंघाने ठेवला होता. मात्र युरोपीय महासंघ जाणीवपूर्वक गुगल, ॲपल, मेटा आणि ॲमेझॉन यांसारख्या अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करून त्यांच्याशी दुजाभाव करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना त्यांनी युरोपीय महासंघाच्या या कारवाईला बेकायदेशीर आणि अनैतिक ठरवले. याआधीही युरोपीय महासंघाला अमेरिकन कंपन्यांवर असा भारी दंड न लावण्याबाबत आपण इशारा दिला होता, याची आठवण करून देत ट्रम्प यांनी आपण आपल्या कंपन्यांना असे लुटू देणार नाही, असे म्हटले आहे.
अमेरिकन कंपन्यांवर लादण्यात आलेले हे सर्व दंड युरोपला पूर्णपणे मागे घ्यावे लागतील, असे ट्रम्प म्हणाले आहेत. याशिवाय, युरोपीय महासंघाने अमेरिकन कंपन्यांना टार्गेट करणे न थांबवल्यास अमेरिकेत आयात होणाऱ्या युरोपीय उत्पादनांवर लवकरच मोठे टॅरिफ लादण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
Comments are closed.