ट्रम्प यांनी पुन्हा भारताला चेतावणी दिली

रशियाकडून तेल घेतल्यास अधिक कर लावणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतातून अमेरिका आयात करीत असलेल्या वस्तूंवर 25 टक्के कर लागू केल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा भारताला इशारा दिला आहे. भारताने कच्च्या तेलाची खरेदी रशियाकडून चालूच ठेवल्यास भारतावरील कर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येतील, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

भारताचा युक्रेनमध्ये किती लोक रशियाच्या हल्ल्यांना बळी पडत आहेत, याची चिंता दिसत नाही. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे इंधन तेल विकत घेत आहे. इतकेच नव्हे, तर हे तेल जगाच्या बाजारात चढ्या किमतीला विकून मोठा नफाही कमावत आहे. रशिया याच तेलाच्या विक्रीतून मिळालेल्या पैशाच्या बळावर युक्रेनशी युद्ध करीत आहे. भारताने रशियाकडून केली जाणारी तेलखरेदी थांबविल्यास रशियाचे उत्पन्न घटणार असून रशिया युद्ध करण्याच्या परिस्थितीत राहणार नाही. त्यामुळे भारताने रशियाकडून मिळणारे तेल विकत घेणे थांबवावे, असा आम्ही त्याला इशारा देत आहोत. भारताने तसे न केल्यास त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर लावण्यात येतील, असे ट्रंप यांनी त्यांच्या संदेशात स्पष्ट केले आहे.

भारताची संयमित प्रतिक्रिया

भारताने ट्रंप यांच्या करांवर आणि आत्ताच्या इशाऱ्यावर संयमित प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ट्रंप यांच्या करनिर्णयांचा आणि त्यांच्या भारतावर होणाऱ्या परिणामांचा आम्ही विचार आणि अभ्यास करीत आहोत. भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या व्यापार करारावर चर्चा होत आहे. आम्हाला अमेरिकेशी एक समतोल, दोन्ही देशांच्या दृष्टीने लाभदायक आणि व्यापार वृद्धी करणारा करार हवा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन भारताच्या वाणिज्य विभागाने केले आहे.

चर्चेच्या पाच फेऱ्या निष्फळ

भारत आणि अमेरिका यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. तथापि, अनेक मुद्द्यांवर एकमत होऊ शकलेले नाही. विशेषत: भारताने अमेरिकेच्या कृषी उत्पादनांना भारताची बाजारपेठ मोकळी करुन देण्यास नकार दिलेला आहे, असे बोलले जाते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक अंतरिम स्वरुपाचा व्यापार करार होऊ शकलेला नाही. हा करार केव्हा होईल, हे अद्याप अस्पष्टच आहे. कारण अमेरिकेने भारतावर 25 टक्के कर लागू केला आहे. आतापर्यंत भारताने यासंबंधी कोणतीही प्रतिद्वंद्वी पावले उचललेली नाहीत. अमेरिकेशी वाद न वाढविता, चर्चेच्या माध्यमातून या पेचप्रसंगावर तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना कितपत यश येते, हे नजीकच्या भविष्यकाळात स्पष्ट होईल.

Comments are closed.