हिंदुस्थानी तांदूळ शिजू देणार नाही, आणखी टॅरिफ लादण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला इशारा

रशियाशी व्यापार सुरूच ठेवणाऱ्या हिंदुस्थानवर आणखी टॅरिफ लादण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. यावेळी त्यांचा रोख हिंदुस्थानातून आयात केल्या जाणाऱया तांदळावर आहे. हिंदुस्थानी तांदूळ अमेरिकेत शिजू देणार नाही, असेच त्यांनी अप्रत्यक्ष ठणकावले आहे.

अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी ट्रम्प यांनी आज अब्जावधी डॉलरच्या पॅकेजची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी हिंदुस्थानसह आशियातून आयात केल्या जाणाऱया अन्नधान्यावर निर्बंध आणण्याचे संकेत दिले. हिंदुस्थानला त्यांचा तांदूळ अमेरिकेत डम्प करू देणार नाही, असे ते म्हणाले. ‘शेतकरी ही देशाची संपत्ती आणि कणा आहेत. अन्नधान्याच्या आयातीमुळे अमेरिकेतील शेतकऱयांना अनेक आव्हांनाचा सामना करावा लागत आहे. टॅरिफ हा त्यांच्या हिताचे रक्षण करण्याचा मार्ग आहे, असे ट्रम्प म्हणाले.

सध्या किती टॅरिफ?

हिंदुस्थानी तांदळावर अमेरिकेत काही दिवसांपूर्वीपर्यंत 10 टक्के आयात शुल्क लागू होते. ट्रम्प यांनी टॅरिफमध्ये वाढ केल्यानंतर ते 40 टक्क्यांवर गेले होते, मात्र निर्यातीवर फारसा फरक पडला नव्हता. अतिरिक्त टॅरिफ लावल्यास त्याचा किती परिणाम होणार हे पाहावे लागणार आहे.

दोन्ही देशांत व्यापार किती?

हिंदुस्थानातून दरवर्षी अमेरिकेला सुमारे साडेतीन हजार कोटींच्या तांदळाची निर्यात होते. त्यात बासमती आणि बिगर बासमती दोन्ही तांदळाचा समावेश होतो. बासमती तांदळाच्या बाबतीत अमेरिका हा हिंदुस्थानचा चौथा मोठा ग्राहक आहे.

Comments are closed.