‘अमेरिकेत या, प्रशिक्षण द्या, मग मायदेशी परत जा’; ट्रम्प प्रशासनाचा H-1B व्हिसाबाबत नवीन विचार

अमेरिकेत H-1B व्हिसाच्या आधारे परदेशातून मोठ्या प्रमाणात कुशल कर्मचारी येतात. यापैकी अनेकजण पुढील आयुष्य अमेरिकेतच घालवतात. त्यामुळे अमेरिकेच्या नागरिकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदावर दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसासंदर्भात मोठे आणि अत्यंत कडक निर्णय घेतले होते. मात्र काही महिन्यांतच त्यांनी या भूमिकेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी मोठी फी आकारून H-1B व्हिसा धारकांना चाप लावणाऱ्या ट्रम्प प्रशासनाने आता परदेशी कुशल कामगारांना अल्प काळासाठी अमेरिकेत आणून अमेरिकन नागरिकांना नोकऱ्यांसाठी प्रशिक्षित करून, त्यांच्यात कौशल्य विकसित करून पुन्हा मायदेशी परतायचे, असे धोरण आखण्याचे ठरवले आहे.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाची नवीन H-1B व्हिसा धोरणाची रणनीती आहे, असे अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी (अर्थमंत्री) स्कॉट बेसेंट यांनी सांगितले. ट्रम्प यांनी नुकतेच स्थलांतर नियमांबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेच्या विपरीत, अमेरिकेला विशिष्ट क्षेत्रांसाठी परदेशी टॅलेंट आवश्यक असल्याचे मान्य केल्यानंतर बेसेंट यांनी हे मत व्यक्त केले.

फॉक्स न्यूजचे ब्रायन किल्मीड यांच्याशी बोलताना, बेसेंट यांनी ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या या नवीन दृष्टिकोनाचे वर्णन Knowledge Transfer चा प्रयत्न अशा शब्दात केले. अनेक दशकांच्या आऊटसोर्सिंगनंतर अमेरिकेतील उत्पादन क्षेत्र (Manufacturing) पुन्हा उभारणे हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

बेसेंट म्हणाले, ‘गेली २०-३० वर्षे आम्ही उच्च दर्जाचे उत्पादन (precision manufacturing) परदेशात पाठवले आहे… आम्ही रातोरात जहाजे तयार करू शकत नाही. आम्हाला सेमीकंडक्टर उद्योग (Semiconductor Industry) अमेरिकेत परत आणायचा आहे. ॲरिझोनामध्ये त्यासाठी मोठी उत्पादन केंद्रे उभी राहतील’.

ट्रम्प यांच्या धोरणाचे स्पष्टीकरण देताना बेसेंट म्हणाले, ‘माझ्या मते, राष्ट्राध्यक्षांचा दृष्टिकोन हा आहे की, कुशल परदेशी कामगारांना तीन, पाच किंवा सात वर्षांसाठी अमेरिकेत आणून त्यांनी अमेरिकेतील कामगारांना प्रशिक्षण द्यावे. त्यानंतर ते मायदेशी परत जाऊ शकतात आणि अमेरिकन कामगार त्या कामाची सूत्रे पूर्णपणे हाती घेतील.’

परदेशी कामगारांमुळे अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या जातील या चिंतेवर बोलताना बेसेंट यांनी हे दावे फेटाळून लावले. ‘परदेशी कामगार अशा नोकऱ्या करत आहेत की अमेरिकन कामगार ती नोकरी करू शकत नाही – अद्याप तरी नाही’, असे ते म्हणाले.

‘आम्ही अनेक वर्षांपासून जहाजे किंवा सेमीकंडक्टरचे उत्पादन येथे केलेले नाही. परदेशातील भागीदारांनी इथे येऊन अमेरिकेच्या कामगारांना शिकवणे, हा एक मोठा यश आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

एच-१बी व्हिसा कार्यक्रमाबाबतचा ट्रम्प प्रशासनाचा हा नवीन दृष्टिकोन, महत्त्वाचे उद्योग देशात परत आणण्याच्या आणि आयातीवरील अवलंबन कमी करण्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करतो, असे बेसेंट म्हणाले.

यावेळी, बेसेंट यांनी ट्रम्प प्रशासनाच्या आर्थिक अजेंड्यावरही भाष्य केले. $100,000 पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना $2,000 टॅरिफ सूट (tariff rebate) देण्यावर चर्चा सुरू असल्याची त्यांनी पुष्टी केली.

बेसेंट यांच्या मते, ट्रम्प प्रशासनाचा व्हिजन ‘पॅरलल प्रॉस्पेरिटी’ (Parallel Prosperity) आहे, जिथे वॉल स्ट्रीट आणि मेन स्ट्रीट यांची प्रगती एकत्र होते आणि हे ट्रेझरी मार्केटला स्थिर आणि तरल ठेवण्यावर अवलंबून आहे.

Comments are closed.