महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान

महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन, असं आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. मनसेच्या भाईंदर – मिरा भाईंदरमध्ये आयोजित मेळाव्यात ते असं म्हणाले आहेत.

तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “मिठाईवाल्याचा साधा छोटा प्रसंग होता. मोर्च्यासाठी माझे महाराष्ट्र सैनिक गेले होते. त्यावेळी तिथे पाणी पिण्यासाठी गेले असता तिथे असणाऱ्या माणसाने विचारले की, कशासाठी मोर्चा काढताय? त्यांनी सांगितलं हिंदी सक्ती केली म्हणून. तर तो म्हणाला, इथे सगळे हिंदीच बोलतात. यावेळी त्यांनी जी काही अरेरावी केली, त्यामुळे त्याच्या जी कानफाडीत बसायची होती, ती बसली. मग लगेच येथील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. विषय समजून न घेता, काय झालं आहे माहित नसताना, कुठल्या तरी, राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन तुम्ही बंद करता. तुम्हाला काय वाटलं, मराठी व्यापारी नाही आहेत? दुकानं बंद करून किती काळ राहणार आहात? शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकानं चालणार ना? महाराष्ट्रात राहत आहात, शांतपणे राहा. मराठी शिका. आमचं तुमच्याशी काही वावडं नाही, पण इथे मस्ती करणार असाल तर, महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार.”

‘दुकाने नाही, शाळाही बंद करेन’

राज ठाकरे म्हणाले की, “पहिली ते पाचवी राज्य सरकराने हिंदी अनिवार्य केली. त्यावरून हे सुरू झालं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं की, तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणारा, आता राज्य सरकारला आत्महत्याच करायची असेल, तर त्यांनी ती बेशक करावी. देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणत आहात तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार. मी आता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर करून बघा. दुकाने नाही, शाळाही बंद करेन.”

ते म्हणाले, “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत आहे. तुम्ही इतर शाळेत मराठी सक्तीची केली पाहिजेत, ते सोडून तुम्ही हिंदी सक्ती करण्याच्या मागे लागलेले आहात. कोणाच्या दबावाखाली? कोण दबाव टाकत आहे तुमच्यावर? केंद्राचे हे पूर्वीपासून आहे. काँग्रेस असल्यापासून आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा होता, तो प्रचंड मोठा लढा होता. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव होता. तो कोणाचा होता तर, काही गुजराती व्यापारी आणि काही गुजराती नेत्यांचा होता.”

Comments are closed.