टीटीपीचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला
तीन कमांडो ठार, प्रत्युत्तरात तीन हल्लेखोरांचाही मृत्यू : मुख्यालयात घुसून आत्मघाती स्फोट
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानातील पेशावर येथील लष्कराच्या फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयावर सोमवारी सकाळी झालेल्या दोन आत्मघाती हल्ल्यात तीन कमांडो आणि तीन हल्लेखोरांसह एकूण सहा जण ठार झाले. यात अन्य काहीजण जखमीही झाले. ‘टीटीपी’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून पेशावरमधील या हल्ल्यानंतर सर्व लष्करी आस्थापनांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. हल्ल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले असून त्यात एफसी चौक मुख्यालयात स्फोट झाल्याचे निदर्शनास येत आहे.
एफसी हे पाकिस्तानमधील एक नागरी लष्करी सेवादल आहे. याचे मुख्यालय पेशावरमधील लष्करी छावणीजवळ गर्दीच्या परिसरातच आहे. हल्लेखोरांनी गोळीबार आणि आत्मघाती हल्ल्यांनी ‘एफसी’च्या कार्यालयाला लक्ष्य केल्यामुळे मोठ्या प्रमाणात सुरक्षा कारवाई सुरू झाली. हा हल्ला सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. पोलिसांनी निमलष्करी इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन स्फोट झाल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेचच, सशस्त्र हल्लेखोर आत घुसल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. याप्रसंगी एफसी कमांडो आणि पोलिसांनी प्रत्युत्तर देताच कॅम्पसमध्ये घुसलेले तीन हल्लेखोर ठार झाले.
पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात झालेल्या या हल्ल्यात किमान दोन आत्मघाती हल्लेखोरांचा सहभाग होता. पोलिसांच्या मते, मुख्य प्रवेशद्वारावर झालेल्या स्फोटात तीन एफसी कर्मचारी ठार झाले, तर त्यानंतर झालेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाले. या हल्ल्यांनंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून अन्य काही हल्लेखोरांकडून काही धोका आहे का हे शोधण्यासाठी मोहीम सुरू असल्याचे पेशावरचे कॅपिटल सिटी पोलीस अधिकारी डॉ. मियाँ सईद यांनी सांगितले.
पहिल्या हल्लेखोराने मुख्य प्रवेशद्वारावर हल्ला केला. त्यानंतरच लगेचच अन्य दोन हल्लेखोरांनी गोळीबार करत कॅम्पसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. सध्या, सैन्य आणि पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. काही दहशतवादी अजूनही मुख्यालयात लपल्याच्या संशयाने दिवसभर शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली होती. अलिकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये, विशेषत: खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये खैबर पख्तूनख्वा येथील बन्नू जिह्यातील एफसी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सहा सैनिक आणि पाच हल्लेखोर ठार झाले होते.
Comments are closed.