तुकाराम महाराज जेऊरकर यांना दैनिक ‘सामना’चा समाज प्रबोधन पुरस्कार, कॉटन ग्रीन येथील संत संमेलनात उद्या पुरस्काराचे वितरण

दैनिक ‘सामना’च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा समाज प्रबोधन पुरस्कार ह.भ.प. वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज जेऊरकर यांना जाहीर झाला आहे. श्री वारकरी प्रबोधन समितीच्या वतीने उद्या, रविवारी कॉटन ग्रीन येथे होणाऱ्या संत संमेलनात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 11 हजार रुपये, आकर्षक स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ह.भ.प. तुकाराम महाराज जेऊरकर यांचा जन्म नाशिक जिह्यातील मालेगाव तालुक्यातील जेऊर या लहानशा खेडेगावात झाला. बालपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने त्यांचे पालनपोषण करताना वारकरी सांप्रदायिक शिकवण दिली. आळंदी येथील ह.भ.प. रामचंद्रबाबा बोधे यांच्या संगतीमुळे ते अध्यात्माकडे वळले. संत तुकाराम महाराजांची संपूर्ण गाथा त्यांनी मुखोदगत केली. पुढे वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार ह.भ.प. गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडकर यांचा अनुग्रह घेतला. नांदगाव तालुक्यातील श्री क्षेत्र शनैश्वर संस्थान नस्तनपूर येथे त्यांची नित्य सेवा सुरु आहे. येथेच तुकाराम महाराज जेऊरकर यांनी अखंड वीणा वादनाचे तप केले. जेऊर या गावी त्यांनी संत तुकाराम महाराजांचे नाशिक जिह्यातील पहिले मंदिर उभारले. 1988 पासून आजतागायत त्यांची कीर्तन सेवा अखंडपणे सुरू आहे. कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून वारकरी व भागवत संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. अनेक शिष्य घडवण्याचे कामही त्यांनी केले.
विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार
श्री वारकरी प्रबोधन समितीच्या वतीने गेली 26 वर्षे मुंबईत पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा हा सोहळा रविवार, 4 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून होणार असून कॉटन ग्रीन राममंदिर ते वडाळा विठ्ठल मंदिर यादरम्यान दिंडी सोहळा होणार आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यादरम्यान जे उपक्रम होतात ते सर्व उपक्रम या पालखी सोहळ्यात होतात. ज्यांना आषाढी वारीमध्ये सहभागी होता येत नाही ते सर्व वारकरी मुंबईतील पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. सात दिवस कीर्तन महोत्सव, संत संमेलन, अश्वाचे गोल रिंगण आणि पालखी सोहळा असे या संमेलनाचे स्वरूप असते.

Comments are closed.