तुळजाभवानी मंदिरावरुन भावकीत जुंपली; आ. राणा पाटलांचा जुना व्हिडिओ दाखवत ओमराजे निंबाळकरांचा सव
धारशिव:तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात तुळजाभवानीच्या शिखरावरून सुरु असलेल्या अफवांवरून आता वादाची ठिणगी पडली आहे. या संदर्भात पत्रकार परिषद घेत खासदार ओमराजे निंबाळकरांनी राणा पाटलांचा जुना व्हिडिओ दाखवत तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि शिखर उतरवण्याचं षडयंत्र कोणाचं? असा सवाल केलाय. मंदिराच्या गाभाऱ्याचे आणि शिखराचे बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे आता भावकीतच थेट जुंपली पाहायला मिळत आहे.
नेमकं प्रकरण काय?
धाराशिव येथील तुळजापूर मंदिर विकास आराखड्यावरून पुन्हा एकदा खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात वाद पेटण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनानंतर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आशिष शेलारांकडे पत्र लिहून तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि शिखर पाडण्यासंदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत. हे एक षडयंत्र असून याबाबत बैठक घेऊन अफवा पसरवणाऱ्यांना चाप लावावा अशी मागणी केली. मात्र आता याच बैठकीच्या मागणीवरून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. तुळजाभवानी मंदिराचे शिखर उतरवण्याबाबतचा राणाजगजीतसिंह पाटील यांचा जुना व्हिडिओ दाखवत. तुम्हीच शिखर उतरवण्याबाबत वक्तव्य केलं मग हे षडयंत्र कोणाच? असा सवाल ओमराजे यांनी उपस्थित केला आहे. मंदिरविकास आराखड्याच्या वादात आता खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील असा सामना पाहायला मिळतोय.
मंदिराच्या शिळांना तडे, पुरातत्व विभागाचा अहवाल
श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता मंदिराचे मुख्य शिखर खाली उतरवावे लागणार का? असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिरातील जुन्या दगडी शिळांना मोठे तडे गेल्यामुळे गाभारा आणि शिखराला धोका असल्याचे राज्य पुरातत्त्व विभागाच्या पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन, पुरातत्त्व विभाग आणि भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तुळजाभवानी मंदिर हे राज्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत आहे. सध्या देवीच्या गाभाऱ्याला लोखंडी बीमचा तात्पुरता आधार देण्यात आला असून, मुख्य शिखरात धोका अधिक वाढल्याने राज्य पुरातत्त्व विभागाने शिखर उतरवण्याबाबत प्राथमिक अहवाल दिला होता.
तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात बदल, शिखर उतरवण्याची चर्चा आणि त्यातून उद्भवलेल्या गैरसमजांमुळे भक्तांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. प्रशासनाने वारंवार स्पष्टीकरण दिले असले तरीही राजकीय नेते यावरून एकमेकांवर आरोप करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.