टी-20 विश्वचषकाआधी अफगाणिस्तानला मोठा धक्का! संघाचा महत्त्वाचा सदस्य वेगळा होणार

टी-20 विश्वचषक 2026 जवळ येत असताना सर्व संघ आपली तयारी जोरात करत आहेत. यंदाच्या टी-20 विश्वचषकात एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. हा मेगा टूर्नामेंट भारत आणि श्रीलंका येथे खेळवला जाणार आहे. पण, या स्पर्धेपूर्वी अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे, कारण या मेगा इव्हेंटनंतर संघाचा एक महत्त्वाचा सदस्य टीमपासून दूर जाणार आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोमवारी जाहीर केले की, जोनाथन ट्रॉट यांचा हेड कोच म्हणून कार्यकाळ टी-20 विश्वचषक 2026 नंतर संपणार आहे. ट्रॉट यांनी 2022 मध्ये अफगाणिस्तान संघाची जबाबदारी स्वीकारली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने अनेक उल्लेखनीय कामगिरी केल्या आहेत.

जोनाथन ट्रॉट यांनी म्हटलं आहे की,
अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघासोबत काम करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. या संघातील खेळाडूंचा जोश, जिद्द आणि मोठं काही साध्य करण्याची भूक पाहून मला खूप प्रेरणा मिळाली. आम्ही मिळून जे काही साध्य केलं त्याचा मला अभिमान आहे आणि मी नेहमीच अफगाण क्रिकेटचा समर्थक राहीन. टीमला आणि अफगाण लोकांना पुढील काळातही यश मिळो, हीच माझी इच्छा आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले की, कोचिंगमध्ये होणारे बदल हे जागतिक क्रिकेट संस्कृतीचा नैसर्गिक भाग आहेत. संघ जसजसा प्रगल्भ होतो, तसतशा त्याच्या नेतृत्वाच्या आणि रणनीतीच्या गरजा बदलतात. कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघाचं नेतृत्व कायम एकाच कोचकडे राहू शकत नाही.

44 वर्षांचे जोनाथन ट्रॉट हे इंग्लंडसाठी खेळलेले अनुभवी क्रिकेटर आहेत. त्यांच्या नावावर कसोटी सामन्यांमध्ये 44.08 च्या सरासरीने 3835 धावा आहेत, ज्यात 9 शतके आणि 19 अर्धशतके समाविष्ट आहेत. त्यांनी 68 वनडे सामन्यांत 51.25 च्या सरासरीने 2819 धावा केल्या आहेत. तसेच, 7 टी-20 सामन्यांमध्ये त्यांनी 138 धावा केल्या आहेत.

Comments are closed.