टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांचा राजीनामा; काय आहे कारण?
टाटा ट्रस्ट वादाच्या पार्श्वभूमीवर टीव्हीएस मोटर कंपनीचे चेअरमन आणि अनेक टाटा ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त (सिनियर ट्रस्टी) वेणु श्रीनिवासन यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी बाई हीराबाई चॅरिटेबल ट्रस्टमधून पदमुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जागरण बिझनेस’च्या वृत्तानुसार, श्रीनिवासन यांनी त्यांच्या इतर व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि व्यस्ततेचे कारण देत हा राजीनामा सादर केला आहे.
वृत्तानुसार, वेणू श्रीनिवासन यांचा हा राजीनामा अशा वेळी आला आहे, जेव्हा माजी ट्रस्टी मेहली मिस्त्री यांनी श्रीनिवासन आणि अन्य एक ट्रस्टी विजय सिंह यांच्या पात्रतेवर कायदेशीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेनुसार, मिस्त्री यांनी महाराष्ट्र चॅरिटेबल कमिशनरकडे एक आक्षेप अर्ज दाखल केला आहे.
मिस्त्री यांचा दावा आहे की, श्रीनिवासन आणि विजय सिंह यांनी नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या अटी कधीच पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे ट्रस्ट डीडच्या (Trust Deed) नियमांनुसार ते या पदासाठी अपात्र ठरतात.
पात्रतेच्या अटी आणि मिस्त्री यांचा युक्तिवाद
मेहली मिस्त्री यांनी अर्जात ट्रस्ट डीडमधील कलम ६ आणि १८ चा हवाला दिला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, जर एखादा ट्रस्टी अपात्र ठरला, तर त्याला कायद्याने मृत मानले (Deemed Dead) जावे, अशी तरतूद आहे. ट्रस्टी होण्यासाठी दोन मूलभूत अटी अनिवार्य आहेत. त्यापैकी प्रमुख अट म्हणजे संबंधितांचे मुंबईत कायमस्वरूपी वास्तव्य असणे आवश्यक आहे, जे या दोघांकडेही नाही.
या आधारावर मिस्त्री यांनी चॅरिटी कमिशनरकडे या प्रकरणाची स्वतःहून (Suo Motu) चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व विद्यमान ट्रस्टींनी आपली पात्रता सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करावे, असे निर्देश देण्याची विनंतीही केली आहे. याचदरम्यान, वेणू श्रीनिवासन यांनी आपला राजीनामा सादर केला आहे.
Comments are closed.